मुंबई : आजापासून देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे.
येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री अरूण जेटली यंदाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. दरवर्षी अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी संबंधित मंत्री एक लाल रंगाची ब्रिफकेस घेऊन आत जाताना दिसतो. मीडियादेखील हा क्षण हमखास कॅमेर्यात बंद करते. पण अर्थसंकल्पादिवशीच लाल बॅग घेऊन अर्थमंत्री संसदेत प्रवेश का करतात ? यामागचा इतिहासही तितकाच रंजक आहे.
अर्थसंकल्प मांडण्याची संकल्पना ही ब्रिटीश लोकांची आहे. ब्रिटीश नेत्यांप्रमाणेच आपणही ही संकल्पना आत्मसाद केली आणि त्यामुळे अर्थमंत्री लाल बॅग घेऊन जातात.
1860 साली ब्रिटीश चान्सलर ग्लॅडस्टोन यांनी लाकडी बॅगेवर लाल रंगाचे लेदर लावले होते. त्यावर महाराणी व्हिक्टोरियाचं मोनोग्राम लावलं. नकळत लाल बॅगेचा पायंडा पडला. अनेकांनी बॅगेचा रंग बदलला पण लाल रंगाचा दिमाख काही वेगळाच होता. त्यामुळे या रंगाचा ट्रेन्ड सुरू झाला.
1733 साली ब्रिटनमध्ये अर्थमंत्री रॉबर्ट वॉलपोल लेदर बॅग घेऊन अर्थसंकल्प मांडायला गेले होते. लेदर बॅगेला फ्रेंच भाषेत 'बोजोट' किंवा 'बुगेट' असे म्हटले जाते. त्याचा अपभ्रंश होऊन 'बजट' हा शब्द आला.
वॉलपोल संसदेमध्ये पोहचले तेव्हा मंत्रीजी बजेट उघडा आणि बघा यामध्ये काय आहे असे त्यांच्या सहकार्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर अनेकांनी देशाचा आर्थिक लेखाजोखा मांडण्याच्या प्रक्रियेला 'बजेट' हेच नाव दिलं.