नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक (Delhi Assembly Election Results 2020) चा निकाल आज लागणार आहे. दिल्लीतील 8 मुस्लीम बहुल विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचे मानले जातात. दिल्लीत अनेक ठिकाणी सीएए विरोधात आंदोलन सुरु आहेत. ओखला विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या शाहीन बागमध्ये २ महिन्यांपासून लोकं आंदोलनाला बसले आहेत. या निवडणुकीत भाजपने शाहीन बागचा मुद्दा उचलून धरला होता. तर अरविंद केजरीवाल यांनी मुस्लीम बहुल भागात निवडणुकीचा प्रचार कमी केला होता. काँग्रेस मात्र शाहीन बागच्या समर्थनात पुढे आली होती.
दिल्लीत मुस्लीम मतदारांची संख्या १२ टक्के आहेत. दिल्लीतील ७० पैकी ८ विधानसभा मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या अधिक आहे. ज्यामध्ये बल्लीमारान, सीलमपूर, ओखला, मुस्तफाबाद, चांदनी चौक, मटिया महल, बाबरपूर आणि किराडी यांचा समावेश आहे. या विधानसभा मतदारसंघामध्ये ३५ ते ६० टक्के लोकं मुस्लीम आहेत.
१. ओखला:
दिल्लीच्या ओखलामध्ये AAP चे अमानतुल्ला खान यांच्यासमोर काँग्रेसचे परवेज हाशमी आणि भाजपचे ब्रह्म सिंह यांचं आव्हान आहे. सध्या या मतदारसंघातून भाजप आघाडीवर आहेत.
२. मटिया महल:
मटिया महल येथे आपचे शोएब इकबाल तर काँग्रेसचे एम मिर्जा आमने-सामने आहेत. आपचे शोएब इकबाल आघाडीवर आहेत.
३. बल्लीमरान :
बल्लीमरान येथून आपचे इमरान हसन आघाडीवर आहेत.
४. सीलमपूर :
सीलमपूर मतदारसंघातून अब्दुल रहमान आघाडीवर आहे.
५. मुस्तफाबाद:
मुस्तफाबाद भाजपचे जगदीश प्रधान आघाडीवर आहेत.
६. किराड़ी:
किराड़ी येथून काँग्रेसने आरजेडीच्या मोहम्मद रियाजुद्दीन यांना मैदानात उतरवलं आहे. आपचे रितुराज गोविंद आणि भाजपचे अनिल झा मैदानात आहेत.
७. बाबरपूर:
बाबरपूरमधून भाजपचे नरेश गौर, आपचे गोपाल राय आणि काँग्रेसचे अनवीक्षा दीक्षित मैदानात आहेत.
दिल्लीत भाजपने एकही मुस्लीन उमेदवार दिलेला नाही. काँग्रेस आणि आपने ५ मुस्लीम उमेदवारांनी तिकीट दिलं आहे. त्यामुळे मुस्लीम मतदार कोणाच्या बाजून मतदान करतात हे निकालात स्पष्ट होईल.