रेड अलर्ट! थर्टी फर्स्टसाठी बाहेर पडताय खरं, आधी पाहून घ्या हवामानाचा अंदाज

Weather Updates : हवामानाचा अंदाज वर्तवताना यंत्रणेनं दिलेल्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. पाहा कुठे वाढणार थंडी आणि कुठे देण्यात आला आहे हा रेड अलर्ट!   

सायली पाटील | Updated: Dec 29, 2023, 07:13 AM IST
रेड अलर्ट! थर्टी फर्स्टसाठी बाहेर पडताय खरं, आधी पाहून घ्या हवामानाचा अंदाज title=
Weather updates cold wave migh increase red alert amid fog in delhi latest updates

Weather Updates : वर्षाचा शेवट होत असतानाच अनेकांचेच पाय पर्यटनस्थळी वळताना दिसत आहेत. वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी म्हणून काहीजण अपेक्षित ठिकाणाच्या दिशेनं निघालेसुद्धा असतील. अशा सर्वच मंडळीनी हवामानाचा अंदाजही लक्षात घ्यावा. कारण पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये हवामान तुम्हाला चकवा देताना दिसू शकतो. गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारी कडाक्याची थंडी महाराष्ट्रातील काही जिल्यांमध्ये कमी झाली असून, दुपारच्या वेळी तापमानात वाढ होत असल्याचं लक्षात येत आहे. इथं मुंबईतून थंडीनं माघारच घेतल्याचं चित्र असल्यामुळं शहरातील नागरिकांचा हिरमोड झाला आहे.  

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील दोन दिवस अर्थात या वर्षाचा शेवट होईपर्यंत तरी ही परिस्थिती सुधारणार नाही. उपनगरीय क्षेत्र आणि डोंगराळ भागांमध्ये मात्र संध्याकाळच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी थंडी दार ठोठावताना दिसेल ही शक्यतासुद्धा नाकारता येत नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. उर्वरित राज्यात मात्र तापमानात चढ- उतार होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला असून राज्यातील हवामान बहुतांशी कोरडंच राहील असं स्पष्टही केलं आहे. 

हेसुद्धा वाचा : मोठी बातमी! पेट्रोल आणि डिझेल तब्बल 10 रुपयांनी स्वस्त होणार? मोदी सरकार देणार नववर्षाचं गिफ्ट

 

राज्यातील थंडी काही प्रमाणात कमी झाल्याचं कारण, उत्तरेकडून राज्याच्या दिशेनं येणाऱ्या वाऱ्यांचा मंदावलेला वेग सांगितलं जात आहे. दरम्यान, उत्तरेकडे अणाऱ्या राज्यांमध्येसुद्धा सध्या थंडी काहीशी कमी झाल्यामुळं त्याचे थेट परिणाम राज्यात दिसून येत आहेत. दरम्यान, अतीव उत्तरेकडे असणारं काश्मीरचं खोरं (Kashmir valley), उत्तराखंड (Uttarakhand) आणि हिमाचल प्रदेशाचा (Himachal Pradesh) पर्वतीय भाग मात्र यास अपवाद ठरत असून, इथं थंडी सातत्य राखताना दिसत आहे. उत्तरेकडे थंडीची लाट पुढील काही तासांमध्ये अधिक तीव्र झाल्यास त्याचे परिणाम राज्याच्या मराठवाडा आणि विदर्भ पट्ट्यावर होऊ शकतात अशी प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. 

दिल्लीत रेड अलर्ट... 

थंडी कमी जास्त होत असताना मुंबई, दिल्ली यांसारख्या ठिकाणांवर प्रदूषणाची समस्या डोकं वर काढत असल्यामुळं दृश्यमानतेवर याचे परिणाम दिसत आहेत. दिल्लीकरांना इतक्यात प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करून घेणं शक्य नसून, आता थंडीमुळं पडणाऱ्या धुक्यानं इथं अडचणी आणखी वाढणार आहेत. 

दाट धुक्याच्या धर्तीवर हवामान विभागाकडून दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगढ भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, उत्तर प्रदेशात ऑरेंज आणि राजस्थानात यलो अलर्ट जारी करम्यात आला आहे. त्यामुळं मोठ्या सुट्टीच्या निमित्तानं तुम्ही उत्तरेकडे जायच्या विचारात असाल, तर बेत हवामानाचा अंदाज पाहूनच आखणं उत्तम!