नवी दिल्ली : घाणीने भरलेला खड्डा, त्यात उतरून ती घाण साफ करणं हे सफाई कर्मचाऱ्यांसाठी काही नवीन नाही. पण, कुणी सुशिक्षित तरुण जेव्हा अशा खड्यात उतरतो तेव्हा त्याला वेडा ठरवलं जात. दिल्लीतल्या अशाच एका युवकानं अशीच खड्डयात साचलेली घाण साफ केली आणि तो 'नायक' ठरला.
दिल्ली महापालिकेची निवडणूक आता जवळ येतेय. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्ष अनेक युक्त्या, क्लुप्त्या लढवीत आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. आगामी एमसीडी निवडणुकांना समोर ठेऊन आपने आतापासूनच कंबर कसली आहे.
याच आम आदमी पक्षाचे नगरसेवक हसीब-उल-हसन यांनी असा काही कारनामा केलाय की यामुळे अनिल कपूरच्या 'नायक' सिनेमाची आठवण येईल. नायकमध्ये अभिनेता अनिल कपूर शत्रुंपासून वाचण्यासाठी एका घाणेरड्या नाल्यात उडी घेतो. त्यांच्यापासून बचाव झाल्यानंतर तो एका वस्तीत जातो. तेथील लोक त्याला ओळखतात आणि त्याच्या अंगावरील घाण साफ करण्यासाठी त्याला दुधाने आंघोळ घालतात.
नगरसेवक हसीब-उल-हसन यांच्याबाबतही असाच काहीसा प्रकार घडलाय. हसीब हसन हे स्वत: एका घाणीच्या खड्ड्यात उतरले. त्यांनी ती घाण साफ केली. ते पाहून सगळे लोक आश्चर्यचकित झाले. यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी हसन यांना दुग्धाभिषेक घातला.
यावेळी आप समर्थकांनी विरोधी पक्ष भाजपला शिव्या घालण्यात कोणतीही कसर सोडली नाही. भाजप मुर्दाबादच्या त्यांनी घोषणा दिल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.