बॉडी बनवण्याच्या नादात तरुणाने गिळले 39 कॉईन आणि 37 लोहचुंबक, कारण काय तर त्यात...

Viral News : पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी अनेक जणं वेगवेगळी औषधं, इंजेक्शन घेतात. पण एका तरुणाने बॉडि बनवण्यासाठी धक्कादायक निर्णय घेतला. या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

राजीव कासले | Updated: Feb 27, 2024, 06:46 PM IST
बॉडी बनवण्याच्या नादात तरुणाने गिळले 39 कॉईन आणि 37 लोहचुंबक, कारण काय तर त्यात... title=

Viral News : पिळदार शरीरयष्टी बनवण्याची क्रेझ सध्याच्या युवापिढीत पाहायला मिळतेय. ही चांगली गोष्ट असली तरी झटपट बॉडी (Body Building) बनवण्यासाठी हे तरुण धक्कादायक पावलं उचलंत आहेत. अनेक तरुण बॉडि बनवण्यासाठी स्टेरॉईड्स, इंजेक्शन किंवा वेगवेगळी औषधं घेतात. याचा वाईट परिणाम तरुणांच्या शरीरावर होऊ शकतो. यामुळेच तरुणांमध्ये हार्टअटॅकचं प्रमाणही वाढलं आहे. पण एका तरुणाने तर इतर तरुणांपेक्षा एक पाऊल पुढे गेलाय. या तरुणाने बॉडि बनवण्यासाठी केलेला प्रकार पाहून डॉक्टरही हैराण झाले.

तरुणाचा धक्कादायक प्रकार
दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पीटलमध्ये 26 वर्षांच्या एक तरुणाला दाखल करण्यात आलं. वारंवार उलटी आणि पोटदुखीच्या त्रासाने हा तरुण त्रस्त होता. काहीही खाल्लं की त्याला त्रास होत होता. तरुणाची स्थिती पाहून डॉक्टरांनी त्याला अतिदक्षता विभागात दाखल करुन घेतलं आणि तात्काळ उपचार सुरु केले. त्याचे रिपोर्ट्स पाहून डॉक्टरही हैराण झाले. त्या तरुणाच्या पोटात चक्क कॉईन (Coins) आणि लोहचुंबकाचे (Magnets) तुकडे आढळले. डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करुन तरुणाचे प्राण वाचवले.

डॉक्टरांनी तरुणाच्या पोटाचा एक्सरे काढल्यानंतर त्यात पोटात कॉईन आणि काही वस्तू दिसल्या. त्यानंतर डॉक्टरांनी त्या तरुणाचा सिटी स्कॅन करण्याचा निर्णय घेतला. कॉईन आणि लोहचुंबकामुळे त्याची पचनशक्ती बिघडली होती. डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करत तरुणाच्या पोटातून चक्क 39 कॉईन आणि लोहचुंबकाचे 37 तुकडे काढले. कॉईन आणि लोबचुंबकाचे तुकडे तरुणाच्या आतड्यांमध्ये अडकले होते. यात 1, 2 आणि 5 रुपयांचे कॉईन होते. शस्त्रक्रियेनंतर तरुणाला सात दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. 

का गिळले कॉईन?
डिस्चार्ज दिल्यानंतर डॉक्टरांनी तरुणाकडे कॉईन गिळण्याचं कारण विचारलं. यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकून डॉक्टरांनी आपल्या कपाळावर हात मारुन घेतला. शरीरातील झिंकचे (zinc) प्रमाण वाढवण्यासाठी त्याने कॉईन गिळली होती. तर कॉईन आतड्यांना चिटकून राहावीत यासाठी त्याने लोबचुंबक गिळली होती. झिंक शरीरासाठी लाभदायक असल्याचं त्याने ऐकलं होतं. हा तरुण मनोरुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.

कोल्हापूरमध्ये धक्कादायक प्रकार
दरम्यान महाराष्ट्रातील कोल्हापूरात पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी तरुणांची दिशाभूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. कमी दिवसात बॉडी बिल्डर व्हायच असेल तर मेफेनटेरमाईन सल्फेट सारखी धोकादायक इंजेक्शन टोचून घ्या सल्ला तरुणांना दिला जात होता. धक्कादायक म्हणजे जिम ट्रेनरकडूनच या तरुणांना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला जात होता.