Assembly Election Results : मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना आणि छत्तीसगड या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. काही तासात मजमोजणीला सुरूवात होणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सेमीफायनल कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिझोरामचा निकाल सोमवारी असल्याने रविवारीचा सुपरसंडे कोणाच्या नावावर राहणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
काँग्रेस असो वा भाजप... दोन्ही पक्षांनी चारही निवडणुकीत भरपूर जोर लावला होता. मात्र, सत्तेता कोणाला देयची हे जनतेच्या हातात असतं. लोकांनी आपलं भविष्य मतदानपेटीमध्ये बंद केलंय. आता कोणाच्या हाती सत्ता जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मध्य प्रदेशात भाजपचीच सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शिवराजसिंह चौहान यांची 18 वर्षांनंतरही जादू कायम असल्याचं दिसतंय. तर काँग्रेसला सत्तेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लगाण्याचा अंदाज आहे. पोल ऑफ पोलच्या आकडेवारीनुसार भाजपला 136, काँग्रेसला 91 तर तीन जागा इतरांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेशात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
राजस्थानच्या महाएक्झिट पोलमध्ये सत्तांतराचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांची सत्ता जाणार असल्याची शक्यता पोल ऑफ पोलमध्ये व्यक्त करण्यात आलीय. भाजप 96 ते 109, काँग्रेस 81 ते 95 आणि इतर 10 ते 18 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजस्थानमध्ये गेल्या 25 वर्षांपासून प्रत्येक वेळी सरकार बदलण्याची परंपरा आहे. त्यामळे आता राजस्थानमध्ये परंपरा कायम राखली जाणार का? असा सवाल विचारला जातोय.
छत्तीसगडमध्ये पोल ऑफ पोलनुसार काँग्रेसला सत्ता मिळण्याचा अंदाज आहे..काँग्रेसला 42 ते 52 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला 35 ते 45 जागा मिळण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये 90 जागा आहेत. त्यामुळे आता छत्तीसगडमध्ये कडवी टक्कर होण्याची शक्यता आहे.
तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी मतदान झालं. इथं काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्ह आहेत. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत तेलंगणात बीआरएसची सत्ता होती. पण यावेळी के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, मिझोरामची मतमोजणी 3 डिसेंबर 2023 रोजी होणार होती. मात्र, आता त्यात सुधारणा करण्यात आली असून आता 4 डिसेंबर 2023 रोजी मतमोजणी (Mizoram Assembly elections) होणार असल्याचं केंद्रिय निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.