मुंबई : संपूर्ण देशभर जाळं पसरलेल्या भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना झालंय तरी काय? असं म्हणायची वेळ आली आहे. आम्ही असं म्हणतोय त्याला कारणही तसंच आहे. पश्चिम रेल्वेमध्ये एक्स्प्रेस गाड्यांत अपंगांसाठी राखीव असलेल्या शौचालयाचा वापर, कँटिन कर्मचाऱ्यांकडून चक्क कोल्ड्रिंक्स आणि मिनरल पाण्याच्या बाटल्या ठेवण्यासाठी केला जात असल्याचं उघड झालं आहे. यावरून पश्चिम रेल्वे प्रशासनाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय.
मीरा रोड परिसरात राहणारे अर्षद 26 एप्रिलला मुंबईतल्या वांद्रे जंक्शन इथून सुटणाऱ्या मुंबई निजामुद्दीन गरीबरथ एक्स्प्रेसमधल्या दिव्यांगांच्या राखीव डब्यातून प्रवास करत होते. प्रवासा दरम्यान अर्षद यांना लघुशंकेसाठी जायचं होतं. म्हणून ते दिव्यांगांसाठीच्या डब्यातल्या शौचालयात गेले. मात्र ते शौचालय बंद होतं म्हणून अर्षद यांनी पुढच्या डब्यातल्या शौचालयाचा वापर केला. त्यानंतर अर्षद पुन्हा आपल्या डब्यात आले असता, आता या डब्यातलं शौचालय त्यांना उघडं दिसलं. म्हणून त्यांनी आत डोकावून पाहिलं. तेव्हा या शौचालयात एक्स्प्रेस गाड्यांच्या कँटिनकरता लागणारी कोल्ड्रिंक्स आणि मिनरल पाण्याच्या बाटल्या भरलेल्या दिसून आल्या...
या प्रकाराबद्दल त्यांनी त्या ठिकाणी सेवेवर असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, याबाबत कुणीही काहीच बोलायला तयार नव्हतं. प्रवाशांच्या आरोग्याशी बिनबोभाट सुरु असलेला हा सगळा प्रकार अर्षद यांनी आपल्या मोबाईल कॅमेरात कैद करुन, पश्चिम रेल्वेचा अनागोंदीपणाच चव्हाट्यावर आणलाय. या प्रकरणी पश्चिम रेल्वेनं कंत्राटदाराला एक लाखाचा दंड ठोठावत कारणे दाखवा नोटीस बजावलीय.
विशेष म्हणजे चहासाठी शौचालयातल्या पाण्याचा वापर केला जात असल्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला होता. सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरचा चार महिन्यांपूर्वीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. त्यानं आताच्या या घटनेनं रेल्वे कँटिन कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणाचं पितळ उघडं पडलंय.