गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेशात संमेलन

राज्यात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नव्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने गुंतवणूकदारांना, व्यावसायिकांना आमंत्रण दिलं आहे.

Updated: Dec 10, 2017, 11:40 PM IST
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेशात संमेलन title=

नवी दिल्ली : राज्यात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नव्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने गुंतवणूकदारांना, व्यावसायिकांना आमंत्रण दिलं आहे.

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी येत्या काळात 'UP Investors Summit-2018' गुंतवणूक संमेलनाचं आयोजन केलं आहे. हे गुंतवणूक संमेलन २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत एका रोड-शोचं आयोजन करण्यात आलं होतं. 

दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोड-शोमध्ये उत्तर प्रदेशचे उद्योगमंत्री आणि त्यांच्यासोबत इतरही संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच अनेक गुंतवणूकदारांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. 

दिल्लीमधील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उत्तर प्रदेश गुंतवणूक संमेलन २०१८ चा लोगो आणि वेबसाईटही लॉन्च करण्यात आली.

उत्तर प्रदेश सरकार या रोड-शोनंतर १८ डिसेंबर रोजी बंगळुरुत, १९ डिसेंबर रोजी हैदराबाद, २१ डिसेंबरला अहमदाबाद, २२ डिसेंबरला मुंबईत आणि ५ जानेवारीला कोलकातामध्ये अशाच प्रकारचे रोड-शो आयोजित करण्यात येतील.

दिल्लीमध्ये आयोजित कऱण्यात आलेल्या रोड-शोमध्ये जवळपास ३५० गुंतवणूकदारांनी सहभाग घेतला. 

या संमेलनात तज्ज्ञांसोबत तसेच विविध मान्यवरांसोबत चर्चा करून गुंतवणूकदारांसाठी त्या-त्या क्षेत्राची दारे खुली केली जाणार आहेत. त्यामुळे आगामी काळात उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, रोजगाराची निर्मिती होईल.