बलात्कार पीडितेला जाळणाऱ्या पाचही आरोपींना अटक, पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू

बलात्काराचे आरोपी पीडितेवर खटला मागे घेण्यासाठी दबाव टाकत होते. परंतु, तिनं यासाठी नकार दिल्यानं जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला

Updated: Dec 5, 2019, 02:04 PM IST
बलात्कार पीडितेला जाळणाऱ्या पाचही आरोपींना अटक, पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू title=

उन्नाव, उत्तरप्रदेश : उन्नावच्या बिहार स्टेशन क्षेत्रातील हिंदूनगर गावात एका बलात्कार पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाचही आरोपींना अटक करण्यात आलीय. या प्रकरणातील फरार असणाऱ्या मुख्य आरोपी शिवम द्विवेदी यानं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला जाळण्यात हरिशंकर त्रिवेदी, रामकिशोर त्रिवेदी, उमेश बाजपेयी तसंच पीडितेच्या बलात्कार प्रकरणातील आरोपी शिवम द्विवेदी आणि शुभम द्विवेदी यांचा हात होता. या पाचही आरोपींना अटक करण्यात आलीय.

उन्नाव बलात्कार पीडितेला जाळण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतलं होतं. तर शिवम द्विवेदी फरार झाला होता. त्यानंतर शिवम द्विवेदी यानं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय.

पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ९० टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे. या तरुणीवर लखनऊच्या सिव्हिल हॉस्पीटलमध्ये 

उपचार सुरू आहेत. प्लास्टिक सर्जनसहीत अनेक डॉक्टरांची एक टीम पीडितेवर उपचार करत आहे. पीडितेच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी एडीजी झोन एसएन सावंत हेदेखील रुग्णालयात दाखल झाले आहे.

बलात्कार प्रकरणातील आरोपी मोकाट

पीडित तरुणीनं याच वर्षी मार्च महिन्यात शुभम त्रिवेदी आणि शिवम त्रिवेदी या दोघांविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटकही केली होती. परंतु, हे आरोपी जामिनावर बाहेर होते. गुरुवारी (५ डिसेंबर) पीडिता याच प्रकरणाच्या सुनावणीसाठी रायबरेलीकडे निघाली होती. रायबरेली जाण्यासाठी रेल्वे पकडण्यासाठी निघालेल्या या तरुणीला आरोपींनी गावाबाहेर शेतातच अडवलं. त्यानंतर त्यांनी तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत पेटवून दिलं. 

पीडितेच्या तक्रारीनुसार, हे आरोपी तिच्यावर खटला मागे घेण्यासाठी दबाव टाकत होते. परंतु, तिनं यासाठी नकार दिल्यानं जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी मागितला अहवाल

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना गुरुवारी सायंकाळपर्यंत या प्रकरणाचा अहवाल मागितलाय. सोबतच योगी सरकारनं सरकारी खर्चावर पीडितेच्या इलाजासाठी हरएक प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाला आरोपींविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत.