गाढवांना अटक, चार दिवसांची कोठडी; उत्तर प्रदेश पोलिसांचा प्रताप

उत्तर प्रदेशात काहीसा अजब प्रकार पुढे आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी चक्क काही गाढवांनाच अटक करून ताब्यात घेतले. इतकेच नव्हे तर, पोलिसांना या गाढवांना चक्क चार दिवसांची कोठडीही दिली.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 27, 2017, 10:34 PM IST
गाढवांना अटक, चार दिवसांची कोठडी; उत्तर प्रदेश पोलिसांचा प्रताप title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात काहीसा अजब प्रकार पुढे आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी चक्क काही गाढवांनाच अटक करून ताब्यात घेतले. इतकेच नव्हे तर, पोलिसांना या गाढवांना चक्क चार दिवसांची कोठडीही दिली.

काय होता गाडवांचा गुन्हा?

ही घटना आहे उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार ही गाढवे न्यायालय परिसरात फिरत होती. न्यायालयाच्या आवारात लावलेल्या झाडांची या गाढवांनी फिरता फिरता नासधूस केली. कायद्याची भाषा समजत नसली तरी या गाढवांनी केलेला तो गुन्हाच होता.

पोलिसांचे म्हणने काय?

पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. के. मिश्रा यांनी दिलेली माहिती अशी की, न्यायालयाच्या आवारात लावलेली अत्यंत महागडी रोपटी या गाडवांनी खाऊन फस्त केली. तसेच, इतर रोपट्यांनाही हानी पोहोचवली. त्यामुळे पोलिसांनी या गाढवांना ताब्यात घेतले. दरम्यान, न्यायालयाच्या आवारात फिरणारी गाढवे पाहून त्यांच्या मालकाला कल्पना देण्यात आली होती, की या परिसरापासून त्याने गाढवे दूर न्यावीत. मात्र, तरीही गाढवांनी आवारात येऊन झाडाच्या रोपट्यांना नुकसान पोहोचवले.

राजकारणातही गाढवांना भाव

दरम्यान, उत्तर प्रदेशला गाढवांचा मूल्य चांगलेच माहिती आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणातही गाढवांचा उल्लेख अनेकदा आला आहे. अगदी गेल्या विधानसभा निवडणुकीतही उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रायबरेलीतील एका सभेत पांढऱ्या गाडवाची खिल्ली उडवली होती. अखिलेश यांनी पर्यटन विभागाच्या एका जाहिरातीची खिल्ली उडवत 'टीव्हीवर एका गाढवाची जाहिरात येते. मी बॉलिवूडच्या बादशहाला विनंती करतो की, त्यांनी गुजरातच्या गाढवांचा प्रचार करणे बंद करावे', असे अखिलेश यांनी आपल्या भाषणात म्हटले होते.