UP Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापलं आहे. काही पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. त्यामुळे उमेदवारांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. पण कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रॅली आणि इतर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवार प्रचारासाठी घरोघरी फिरत आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर उमेदवाराच्या प्रचाराचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
कानपूरच्या गोविंदनगर मतदारसंघातील भाजप आमदार सुरेंद्र मैथानी प्रचारासाठी सध्या घरोघरी जाऊन लोकांची भेटी-गाठी घेत आहेत. याचदरम्यानचा मैथानी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मैथानी आपल्या मतदारसंघातील एका घरात जातात. तिथे ते थेट मतदाराच्या बाथरुममध्ये जाऊन मतदाराशी संवाद साधताना दिसत आहेत.
डोक्याला साबण लावलेल्या या व्यक्तीला मैथानी आपलं प्रचारपत्र देतात, तसंच त्याची विचारपूस करताना विचारतात सर्वकाही ठिक आहे ना, तुमचं घर व्यवस्थित बांधलं गेलं आहे ना?
आता अचानक थेट बाथरुमध्येच नेते आल्याने त्या माणसालादेखील क्षणभर काय बोलावं सुचलं नसेल. पण नेते मात्र बिनधास्त संवाद साधताना दिसत आहेत.
A @BJP4UP MLA in Kanpur on a door to door campaign walks into the home of a man taking a bath , asks him - colony(house) ho gayi , ration card hai ? Man - haan haan haan ; haan sab hai pic.twitter.com/ezZntatZYM
— Alok Pandey (@alok_pandey) January 14, 2022
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून युजर्सही अनेक प्रतिक्रिया देत आहेत.
उत्तरप्रदेशमध्ये ७ टप्प्यात निवडणूक
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. यूपीमध्ये 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होऊन विधानसभा निवडणुकीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 55 जागा, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात 59 जागा, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागा, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 60 जागा, तीन मार्चला सहाव्या टप्प्यात 57 जागा आणि 7 मार्चला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 54 जागांवर मतदान होणार आहे.