नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया 500 रूपयांच्या दोन वेगवेगळ्या नोटांची छापाई करत असून, हा या दशकातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा सनसनाटी आरोप विरोधकांनी केला आहे. नोटा छापाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेतील वातावरण मंगळवारी चांगलेच तापले. या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाजही स्थगित करावे लागले.
दरम्यान, विरोधकांनी रिझर्व बॅंक ऑफ इंडियाकडून छापल्या जाणाऱ्या 500 रूपयांच्या नोटा दोन वेगवेगळ्या रूपात असून, त्याचा आकार, डिझाईन सगळेच वेगळे आसल्याचा आरोप विरोधकांनी केला. या वेळी विरोधकांनी उदाहरण म्हणून या नोटाही दाखवल्या. वेगवेगळ्या रूपात नोटा झापण्यावर आक्षेप घेताना 'केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय का घेतला हे आज आम्हाला कळलं’, असा टोला कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी लगावला. तसेच, ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन वेगवेगळ्या नोटांची छपाई केली आहे. या नोटांचा आकार आणि डिझाईन वेगवेगळे आहेत. हे कसं काय शक्य आहे ?', असा सवालही सिब्बल यांनी विचारला
दरम्यान, सिब्बल यांचा धागा पकडत कॉंग्रेस नेते गुलाम नबी आजाद यांनीही सरकारला धारेवर धरले, 'आम्ही कधीच दोन वेगवेगळ्या एक पक्षासाठी आणि एक सरकारसाठी अशा नोटा छापलेल्या नाहीत. बाजारात 500 आणि 2000 च्या दोन वेगवेगळ्या नोटा आहेत', असा आरोप आजाद यांनी या वेळी केला.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री अरून जेटली यांनी विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, कॉंग्रेस सभागृहामध्ये कोणतेही गांभीर्य नसलेले विषय उपस्थित करत असल्याचा आरोप केला. या वेळी ‘सभागृहामध्ये नोटांबाबत बेजबाबदारपणे वक्तव्य तर केले जात आहेच.पण, शुन्य प्रहराचा गैरवापरही विरोधकांकडून केला जात आहे’, असा आरोप जेटली यांनी केला.
दरम्यान, कॉंग्रेसने उपस्थित केलेल्या नोटा छापाईच्या मुद्द्यावर विरोधक एकजुट झाल्याचे चित्र सभागृहात दिसले. 'नोटांकडे पाहा, कपिल सिब्बल यांनी अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे' असे म्हणत, तृणमूल कॉंग्रेसचे सदस्य डेरेक ओब्रिएन यांनी काँग्रेला पाठिंबा दिला. तर, जनता दलाचे नेते शरद यादव आणि समाजवादी पक्षाचे नेता नरेश अग्रवाल यांनीही कॉंग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्द्याला पाठिंबा दिला.
दरम्यान, विरोधकांनी दाखवलेल्या नोटा दाखवल्या तसा त्याचा स्त्रोतही जाहीर करावा असे सांगत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नखवी यांनी चेंडू विरोधकांकडेच बोट दाखवले. तर, या नोटांची सत्यता तपासली जाईल असं केंद्रिय मंत्री अरूण जेटली यांनी सांगितलं.