नवी दिल्ली : पेट्रोल - डिझेलच्या दरांत २८ व्या दिवशीही घसरण झालीय. मंगळवारी पेट्रोल - डिझेलच्या दरांत सामान्य व्यक्तीला दिलासा मिळालाय. तेल कंपन्यांनी देशातील चार शहरांत पेट्रोलवर १४ ते १८ पैसे प्रती लीटरपर्यंत कपात केलीय. डीझेलमध्ये १० ते १२ पैशांची कपात झालीय. गेल्या २८ दिवसांत चेन्नईमध्ये पेट्रोल ३.०३ रुपये आणि मुंबईत ३.१२ रुपये स्वस्त झालंय.
कर्नाटक निवडणूक निकालानंतर ३० मेपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांत घसरण सुरू झालीय. राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतींत मंगळवारी १४ ते १८ पैशांची कपात करण्यात आलीय तर डिझेलमध्येही १० ते १२ पैशांची कपात झालीय. दिल्लीत मंगळवारी पेट्रोल ७५.५५ रुपये प्रती लीटर आणि डिझेल ६७.३८ रुपये प्रती लीटर आहे.
२६ जून रोजी दिल्ली आणि कोलकातामध्ये १४ पैसे, मुंबईत १८ पैसे आणि चेन्नईत १५ पैसे प्रती लीटर कपात करण्यात आलीय. तर डिझेलच्या दरांत दिल्ली, चेन्नई आणि कोलकातामध्ये १० पैसे प्रती लीटर आणि मुंबईत १२ पैसे प्रती लीटर कपात करण्यात आलीय.
सध्या मुंबईत पेट्रोल ८३.१२ प्रती लीटर आणि डिझेल ७१.५२ रुपये प्रती लीटर दरानं उपलब्ध होतंय.