नवी दिल्ली : तुम्ही यंदाच्या दिवाळीत सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग तुम्हाला पैशांसोबतच आणखीन एक गोष्ट द्यावी लागणार आहे.
सरकारने प्रत्येक महत्वाच्या कामांसाठी आता आधार कार्ड आवश्यक केलं आहे. त्याच प्रमाणे सोनं खरेदीसाठीही आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आधार कार्डही सादर करावं लागणार आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या नव्या नियमानुसार, यंदाच्या दिवाळीत तुम्हाला ज्वेलर्सकडे आधार कार्ड नंबर देणं अनिवार्य होण्याची शक्यता आहे. नव्या नियमानुसार, ५०,००० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक ज्वेलरी खरेदी केल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर सरकारी ओळखपत्र सादर करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.
केंद्र सरकारने काळ्या पैशावर लगाम लावण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. असं मानलं जात की, आपली अघोषित संपत्ती अनेकजण सोनं खरेदी करुन गुंतवतात. नोटबंदीनंतर या प्रकारात वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.