पेन्शनमध्ये २० टक्के कपात? अर्थखात्याकडून स्पष्टीकरण

लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.  

Updated: Apr 19, 2020, 06:11 PM IST
पेन्शनमध्ये २० टक्के कपात? अर्थखात्याकडून स्पष्टीकरण  title=

मुंबई : लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. गेल्या काहीदिवसांपासून केंद्र सरकार निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये २० टक्के कपात करण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा देखील चांगल्याच रंगल्या होत्या. परंतु या सर्व अफवांवर खुद्द अर्थखात्याने पूर्णविराम दिला आहे. केंद्र सरकार निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये २० टक्के कपात करणार नाही असं ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

'केंद्र सरकार निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये २० टक्के कपात करणार असल्याच्या बातम्या अनेक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. परंतु या सर्व बातम्या खोट्या आहेत. पेन्शनमध्ये कोणत्याही प्रकारची कपात केली जाणार नाही. त्याचप्रमाणे वेतनात देखील कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही.' असं स्पष्टीकरण अर्थखात्यानं दिलं आहे. 

दरम्यान, आज मध्यरात्रीपासून कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल होणार आहेत. मात्र, कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध कायम असतील. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.