लखनऊ : उत्तर प्रदेशातील बांदा येथे चोरीची एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सुरुवातीला चोरट्यांनी वेल्डिंगच्या दुकानातून हजारो किंमतीच्या मालावर हात साफ केला, मात्र नंतर चोरट्यांनी असं काही भावूक वक्तव्य केलं जे पाहून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. या चोरट्यांनी चोरलेली प्रत्येक वस्तू परत केली आणि ज्याच्या दुकानात चोरी केली, त्याची माफी देखील मागितली. चोरांनी ही घटना घडण्यामागे आम्हाला चुकीची माहिती असल्याचे सांगितले आणि चोरीचा माल एका गोणीत आणि पेटीत भरून माफीनामा लिहिला. ही घटना पोलिसांसह परिसरात देखील चर्चेचा विषय ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बिसांडा पोलीस स्टेशन हद्दीतील चंद्रयाल गावात राहणारा दिनेश तिवारी हा आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब आहे. काही वेळापूर्वी त्याने व्याजाने 40 हजार रुपये कर्ज घेऊन वेल्डिंगचे नवीन काम सुरू केले होते.
नेहमीप्रमाणे 20 डिसेंबर रोजी सकाळी तो त्यांचे दुकान उघडण्यासाठी पोहोचला असता दुकानाचे कुलूप तुटलेले त्याला दिसले, त्याला अवजारांसह इतर साहित्य चोरीला गेलेले दिसले. त्यानंतर त्यांनी बिसंडा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. घटनास्थळी निरीक्षक उपलब्ध नसल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नाही.
परंतु त्यानंतर 22 डिसेंबर रोजी त्याच्या घरापासून काही अंतरावर रिकाम्या जागेवर त्याचे सामान पडले असल्याचे त्याला गावातील लोकांकडून समजले. आपले सामान परत मिळालेले पाहून दिनेशला आनंद झाला.
परंतु चोरीला गेलेली गोष्ट चोरांनी पुन्हा का केली हा सगळ्यांना प्रश्न पडला.
चोरट्यांनी परत केलेल्या वस्तूसोबत एक कागदी चिठ्ठी चिकटवली, ज्यावर त्यांनी लिहिले होते, "हे दिनेश तिवारीचे सामान आहे. आम्हाला तुमच्याबद्दल बाहेरच्या व्यक्तीकडून कळले. आम्हाला फक्त ज्याने माहिती दिली त्यालाच माहीत आहे की, तो दिनेश तिवारी एक सामान्य व्यक्ती नाही. पण जेव्हा आम्हाला तुमच्याबद्दल कळले तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटले. म्हणूनच आम्ही तुमचे सामान परत देतो."
चोरांच्या या पत्रावरुन चोर बाहेरचे आहेत, तर चोरांची मदत करणारी व्यक्ती ही स्थानिक असल्याचे सिद्ध झाले, ज्याची पोलीसांनी नोंद केली आहे.
दिनेशच्या दुकानातुन चोरट्यांनी 2 वेल्डिंग मशीन, 1 काटा (वजन), 1 मोठे कटर मशीन, 1 ग्लँडर आणि 1 ड्रिल मशिनमधून एकूण 6 वस्तू चोरल्या होत्या. आपले सामान परत मिळवल्यानंतर दिनेशला फार आनंद झाला, त्याने देवाचे आभार मानले आणि पोलीसात आपले सामान परत मिळाले असल्याचे कळवले.