मुंबई : जगात अशी अनेक ठिकाण आणि गोष्टी आहेत ज्यांची रहस्य आजही कायम आहेत. यामध्ये काही मंदिरांचाही समावेश आहे. भारतातील प्रसिद्ध ऐतिहासिक मंदिरांमध्ये समाविष्ट असलेलं विरूपाक्ष मंदिर कर्नाटकातील हम्पीमध्ये आहे. हंपी हे रामायण काळातील किष्किंधाचे असल्याचं मानलं जातं.
या मंदिरात भगवान शंकराच्या विरुपाक्ष रूपाची पूजा केली जाते. युनेस्कोच्या जागतिक हेरिटेजमध्ये या प्राचीन मंदिराचा समावेश आहे. या मंदिराची अनेक वैशिष्ठ्यं असून त्याच्याशी रहस्यही जोडलं गेलंय. इंग्रजांनीही या मंदिराचं रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही.
या मंदिराची रहस्यमय गोष्ट म्हणजे मंदिरातील काही खांबांमध्ये एक आवाज येतो. हा आवाज संगीताचा असतो. म्हणूनच त्यांना संगीत स्तंभ देखील म्हणतात.
इंग्रजांनी खांबांमधून संगीताचा आवाज कसा येतोय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. त्यासाठी त्यांनी या मंदिराचे खांब तोडले आणि पाहिलं. मात्र यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण खांब आतून पोकळ होते आणि त्यात काहीही नव्हते. हे रहस्य आजतागायत उलगडलं नाही म्हणून याला रहस्यमय मंदिर म्हणतात.
भगवान विरुपाक्ष आणि त्यांची पत्नी देवी पंपा यांना समर्पित या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथलं शिवलिंग दक्षिणेकडे झुकलेले आहे. रामाशी युद्धात विजय मिळवण्यासाठी रावणाने शिवाची पूजा केली, अशी धार्मिक मान्यता आहे. यानंतर जेव्हा भगवान शंकर प्रकट झाले तेव्हा रावणाने त्यांना लंकेत शिवलिंग स्थापन करण्यास सांगितलं.
रावणाच्या वारंवार प्रार्थनेनंतर भगवान शिव राजी झाले, परंतु त्याने त्याच्यासमोर एक अट ठेवली. लंकेला नेत असताना शिवलिंग जमिनीवर ठेवू नये, अशी अट होती. रावण शिवलिंग घेऊन लंकेला जात होता, पण वाटेत त्याने एका व्यक्तीला शिवलिंग धरायला दिले, पण त्याच्या वजनामुळे त्याने शिवलिंग जमिनीवर ठेवले. तेव्हापासून हे शिवलिंग इथेच राहिलं. अनेक प्रयत्न करूनही ते हलवता आलं नाही.