मुरादाबाद : 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेत युधिष्ठिर ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेता गजेंद्र चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आधुनिक भारतातील युधिष्ठिर म्हटलं आहे. नि:स्वार्थपणे देशाच्या सेवा करणाच्या त्यांच्या वृत्तीमुळे मोदी युधिष्ठिर असल्याचं वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केलं. मुरादाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली असता त्याच वेळी त्यांनी हे लक्षवेधी वक्तव्य केलं.
चित्रपट विश्वाची सद्यस्थिती आणि राजकारणाविषयी आपले विचार त्यांनी यावेळी मांडले. देशात जेव्हा जेव्हा निवडणूका येतात तेव्हा बऱ्याच गोष्टींची चर्चा होते. 'उत्तर प्रदेशातील महाभारत, दिल्लीतील महाभारत.... प्रत्येक महाभारतात एका युधिष्ठिराची गरज असते. ज्या प्रकारे २०१४ मध्ये जनतेने मोदींना विजयी करत देशाची धुरा त्यांच्या हातात सोपवली होती त्याचीच आता पुनरावृत्ती होणार आहे. त्या महाभारतात युधिष्ठिराकडे हस्तिनापूराची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तर या युगात भारताची जबाबदारी ही या आधुनिक दिवसांतील युधिष्ठिररुपी मोदींवर सोपवण्यात येणार आहे, जे या देशाची नि:स्वार्थ सेवा करत आहेत', असं ते म्हणाले.
चौहान यांनी आपल्या वक्तव्यातून भविष्यातील भारताच्या परिस्थितीचं चित्रणही केल्याचं पाहायला मिळालं. २०४०- ५० मध्ये देश जेव्हा वाईट परिस्थितीतून जात असेल तेव्हा मोदींचा आठवण जनतेला होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. आगामी लोकसभा निवडणूकांमध्ये मोदींच्या नेतृत्याखाली भाजपच्या वाट्याला घवघवीत यश मिळणार आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.