Telangana University च्या उपकुलगुरुंना अटक! बेडरुमध्ये सापडली अशी गोष्टी थेट तुरुंगात

Telangana University: या प्रकरणामध्ये लेखी तक्रार मिळाल्यानंतर छापेमारी करण्यात आली. या छापेमारीदरम्यान विभागाने हैदराबादमधील घरावर छापा टाकला. यावेळी बेडरुममध्ये सापडलेल्या गोष्टींच्या आधारेच अटकेची कारवाई करण्यात आली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 18, 2023, 05:14 PM IST
Telangana University च्या उपकुलगुरुंना अटक! बेडरुमध्ये सापडली अशी गोष्टी थेट तुरुंगात title=
त्यांना विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं

Telangana University: तेलंगण विद्यापीठाचे (Telangana University) उपकुलगुरुंना (Vice Chancellor) अटक करण्यात आली आहे. डी. रविंदर दाचेपल्ली (Dachepalli Ravinder) यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत खात्याने हैदराबादमध्ये केलेल्या कारवाईनंतर डी. रविंदर दाचेपल्ली यांना अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. डी. रविंदर दाचेपल्ली यांच्या घरामध्ये छापेमारी करण्यात आली असता त्यांच्या घरातील बेडरुममध्ये 50 हजार रुपये सापडले.

रंगेहाथ पकडलं

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाचलुचपत विभागाकडे एका याचिकार्त्याने तेलंगण विद्यापीठाच्या उपकुलगुरुंविरुद्ध तक्रार केली होती. उपकुलगुरु लाच घेत असल्याचं या तक्रारदाराने म्हटलं होतं. 2022-23 मध्ये भीमगल येथे एक परीक्षा केंद्र असावं हा निर्णय घेण्यासाठी डी. रविंदर दाचेपल्ली यांनी लाच मागितल्याचं सांगण्यात आलं आहे. लाचलुचपत विभागाच्या कारवाईमध्ये उपकुलगुरुंना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. 

किती लाच घेतली?

लेखी तक्रारीमध्ये उपकुलगुरुंनी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपकुलगुरुंनी 50 हजार रुपये लाच घेतली होती. उपकुलगुरुंच्या घरामधील बेडरुममध्ये असलेल्या तिजोरीमध्ये हे पैसे सापडल्याचही लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. हे पैसे उपकुलगुरुंनी निझामाबादमधील आरमोर येथील श्री शिर्डी साई शैक्षणिक सोसायटीचे अध्यक्ष डी. शंकर यांच्याकडून घेतले होते. 

चौकशी सुरु

उपकुलगुरुंच्या घरावर धाड टाकण्याआधी लाचलुचपत विभागाने गोळा केलेल्या प्राथमिक माहितीमध्ये आरोपांमध्ये तथ्य असल्याची शंका आल्यानंतर तातडीने विभागाने कारवाई करुन छापेमारी केली. उपकुलगुरुंना हैदराबाद येथील एसपीई आणि एसीबी प्रकरणासंदर्भातील कोर्टाच्या प्रधान विशेष न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येणार आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. एवढ्या मोठ्या विद्यापीठामधील उपकुलगुरुंनी अशाप्रकारे लाच घेण्याचा हे मागील काही काळातील पहिलेच मोठे प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये उपकुलगुरुंना इतर कोणी मदत केली आहे, यापूर्वी अशाप्रकारची लाज घेण्यात आली का याबद्दलचा तपास सध्या लाचलुचपत विभागाकडून केली जात आहे. या प्रकरणामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रामधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून एवढ्या मोठ्या स्तरावरील अधिकारी लाच घेताना पकडला जात असेल तर खालच्या स्तरावर किती भ्रष्टाचार सुरु असेल असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.