'Hyderabad एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर कोणतीही कारवाई नको'

निर्भयाच्या आईची मागणी

Updated: Dec 6, 2019, 09:23 AM IST
'Hyderabad एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर कोणतीही कारवाई नको' title=
छाया सौजन्य- एएनआय

नवी दिल्ली : हैदराबाद डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणीच्या चारही आरोपींचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हे एनकाऊंटर झाल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यानंतर तेलंगणा पोलिसांकडून या वृत्ताला दुजोराही देण्यात आला. याच घटनेनंतर आता देशभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. आरोपींवर तेलंगणा पोलीसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचं निर्भयाच्या आईकडून समर्थन करण्यात आलं आहे. 

एनकाऊंटरवर एकिकडून काही प्रश्न उपस्थित केले जात असतानाच निर्भयाच्या आईने मात्र पोलिसांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाऊ नये कारण, त्यांनी जे केलं ते योग्यच होतं अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. 

हैदराबाद बलात्कार एन्काऊंटर प्रकरण, उदयनराजे म्हणतात...

'आजही मी न्यायालयाच्या फेऱ्या मारत आहे, आता मला न्याय द्या अशी आर्जव करत हैदराबादमधील घटनेनंतर त्या मुलीच्या कुटुंबीयांना माझ्यासारखा संघर्ष करावा लागू नये असंच मला वाटत होतं. ज्यावर आता कारवाई झाली आहे. मुख्य म्हणजे आता निर्भया आणि इतरही बलात्कार पीडितांना फाशीचटी शिक्षा दिलीच गेली पाहिजे', असं त्या म्हणाल्या. 

हैदराबाद पोलीस आणि प्रशासनाचे आभार मानत आपल्यालाही न्याय मिळेल यासाठीचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी निर्भयाला न्याय मिळण्यास होणारी दिरंगाई आणि बलात्काराचं कृत्य याविषयी बोलताना तिच्या आईच्या आवाजातून संताप आणि वेदना व्यक्त होत होत्या. पोलिसांशीच गैरव्यवहार करण्याचं धाडस करणाऱ्या हैदराबाद बलात्कारातील आरोपींवर करण्यात आलेली ही कारवाई पाहता आता किमान पोलिसांशी गैरव्यवहार करण्यास हे नराधन धजावणार नाहीत अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली. गेल्या सात वर्षांपासून निर्भया बलात्कार प्रकरणी तिच्या कुटुंबीयाना वारंवार न्यायालयीन फेरा घालावा लागत आहे. पण, आता मात्र याप्रकरणीच्या दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी आर्जव त्यांनी प्रशासनाकडे केली. 

आजच्या क्षणापर्यंत आपण वारंवार प्रशासनाकडे आरोपींच्या शिक्षेची मागणी केली. पण, त्यांच्या मानवाधिकारांचा मुद्दाच पुढे केला गेला. गेल्या सात वर्षांपासून आम्ही संघर्ष करत आहोत. दर दिवशी आम्ही मरणयातना सहन करत आहोत. तेव्हा आतातरी निर्भयावर अत्याचार करणाऱ्या आणि हे अमानवी कृत्य करणाऱ्यांना फाशी द्या, हाच सूर निर्भयाच्या आईने आळवला.