टाटा समूहात पगार कपात; इतिहासात पहिल्यांदाच आली ही वेळ

कोरोना व्हायरसचा फटका 

Updated: May 25, 2020, 04:18 PM IST
टाटा समूहात पगार कपात; इतिहासात पहिल्यांदाच आली ही वेळ title=

मुंबई : कोरोना व्हायरस या महामारीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईकरता टाटा समुहावर इतिहासात पहिल्यांदाच ही वेळ आली आहे. टाटा सन्सचे चेअरमन आणि सहाय्यक कंपन्यांच्या सीईओंच्या वेतनात २०% कपात केली हे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि व्यवहारात असलेली सुनिश्चितता ठेवणं आहे. 

 टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेस (TCS) ही टाटा सन्स समूहातील सर्वात महत्त्वाची आणि सर्वात जास्त फायदा मिळवून देणारी कंपनी आहे. सर्वात प्रथम टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथ यांच्या पगारात कपात करण्याची घोषणा केली. तसेच इंडिया हॉटेल्सने याआधीच सांगितले की ते वरिष्ठांच्या या तिमाहीतील पगाराचा एक भाग कंपनीला झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून देणार आहेत.

त्याचप्रमाणे टाटा समुहातील टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा इंटरनॅशनल, टाटा कॅपिटल तसेच वोल्टास या सर्व कंपन्यांचे सीईओ आणि एमडी देखील कमी पगार घेणार आहेत. चालू आर्थिक वर्षात या कंपन्यांच्या बोनसमध्ये देखील कपात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होत आहे. यावेळी व्यवसाय वाचवण्यासाठी काही कठोर निर्णय घेणे गरजेचे असल्याचे टाटा ग्रुपमधील एका सीईओने सांगितले आहे. टाटा समुहाची संस्कृती आहे की शक्य असेल तिथपर्यंत कर्मचाऱ्यांच्या हिताचे संरक्षण करावे.

टाटा समूहाच्या इतर देशातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा आणि सीईओ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या पगारात कपात केली आहे. पण टाटाने आतापर्यंत कर्मचारी कपात केलेली नाही. याआधी झोमॅटो, स्विगी, शेअरचॅट आदी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली आहे. मात्र टाटाने तसे न करता पगार कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.  टाटा समूहाने करोना विरुद्ध लढण्यासाठी १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत दिली आहे.