Tamil Nadu Stampede At Free Sari Distribution Program: तामिळनाडूमधील (Tamil Nadu) तिरुपत्तूर जिल्ह्यामधील वन्नियामबाडी येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. येथे घडलेल्या चेंगराचेंगरीच्या (Tamil Nadu Stampede) घटनेमध्ये चार वयस्कर महिलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये 11 महिला जखमी झाल्या आहेत. मोफत साडी वितरण कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरीचा हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 'थोईपूसम' उत्सवाच्या आधी अयप्पन नावाच्या व्यक्तीने मोफत साडी वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यासाठी मोठ्या प्रमाणात महिलाांनी गर्दी केली होती. याचवेळेस अचानक गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.
या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी महिलांना रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. मरण पावलेल्या महिलांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मरण पावलेल्या महिलांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मरण पावलेल्या महिलांच्या कुटुंबियांना 2-2- लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार थाईपूसम हिंदू तमिळ समुदायाकडून थाई या तमिळ महिन्यामधील पोर्णिमेच्या दिवशी 'थोईपूसम' उत्सव साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर एका व्यक्तीने मोफत साडी वाटप कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
या दुर्घटनेसंदर्भात पोलीस निरिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार 'थोईपूसम'च्या निमित्ताने मोफत साडी वाटपासाठी वाटली जाणारी टोकन मिळवण्यासाठी महिलांनी गर्दी केली. याचदरम्यान चेंगराचेंगरी झाली. यात चार वृद्ध महिलांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल असं सांगताना पोलिसांनी या कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी आयोजकांनी घेतली नव्हती असंही म्हटलं आहे. अशाप्रकारे मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करताना स्थानिक पोलिसांची परवानगी घेणं बंधनकारक असतं.