दोन वेळचं पोट भरणंही स्वप्नाहून कमी नव्हतं, तोच तरुण आज इडली- डोसा पीठ विकून बनला कोट्यधीश

शिक्षण अर्ध्यावर सुटलं, वडिलांना रोजंदारी मिळत होती... 

Updated: Jul 27, 2022, 09:07 AM IST
दोन वेळचं पोट भरणंही स्वप्नाहून कमी नव्हतं, तोच तरुण आज इडली- डोसा पीठ विकून बनला कोट्यधीश  title=
Success story iD Fresh Food Musthafa PC jpurney School Dropout to CEO

मुंबई : सतत प्रयत्न करुनही अनेकदा यश पदरी पडत नाही आणि तिथेच आपल्या संयमाचा बांध फुटतो. जीवाचा आटापिटा करुनही एखादी गोष्ट मिळत नाही, त्यावेळी होणाऱ्या वेदना नेमक्या काय असतात याची नव्यानं ओळख करुन देण्याची गरज नाही. पण, स्वप्नांचा पाठलाग करणं सोडण्यापेक्षा त्या स्वप्नांच्याच साथीनं मोठं होण्याचा प्रयत्न केलाय का कधी? (Success story iD Fresh Food Musthafa PC jpurney School Dropout to CEO)

केरळमधील एका व्यक्तीनं हा प्रयत्न केला. आयुष्यातील खाचखळगे त्याच्यासाठी प्रमाणाहून जास्तच आव्हानात्मक ठरले. पण, तो खचला नाही. विश्वास बसणार नाही, पण इडली आणि डोश्याचं पीठ विकून त्यानं कोट्यवधींच्या श्रीमंतीचा डोलारा उभा केला. या व्यक्तीचं नाव, मुस्तफा पीसी. 

कोण आहेत Musthafa PC? 
मुस्तफा पीसी यांचा जन्म केरळमध्ये झाला. त्यांचे वडील कुली होते. इयत्ता सहावीमध्ये असताना शालेय जीवनात अपयशी ठरल्यानंतर वडिलांना शेतीच्या कामात मदत करण्यासाठी म्हणून त्यांनी शाळा सोडली. 'आम्ही कसेबसे दिवसाला 10 रुपये कमवत होतो. दिवसातून तीन वेळचं खाणं मिळवणं म्हणजे एक स्वप्न. मी स्वत:ला कायम सांगत असायचो की शिक्षणाहून महत्त्वाचं आहे ते म्हणजे अन्न', असं ते एका मुलाखतीत म्हणाले. 

शाळेतून बाहेर पडलेल्या मुस्तफा यांना शालेय जीवनात परतण्यासाठी एका शिक्षकांची मदत झाली, त्यांच्यामुळेच ते शैक्षणिक आयुष्यात पुढे गेले. त्यांनी गणित विषयात अग्रगणी गुण मिळवले. मुस्तफा यांची कामगिरी पाहून शिक्षकांनी एकत्र येत त्याच्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च उचलला. 

पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भारतात नोकरीला सुरुवात केली, कालांतरानं परदेशाची वाट धरत इतकी कमाई केली, की अवघ्या दोन महिन्यांमध्ये वडिलांचं 2 लाख रुपयांचं कर्ज त्यांनी फेडलं. नोकरी असतानाही, त्यांनी व्यवसाय क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यासाठी उडी घेतली. भावंडांपैकी एकानं त्यांना इडली- डोसा बनवण्यासाठीचं उत्तम प्रतीचं पीठ विकण्याचा सल्ला दिला. ज्यानंतर त्यांनी 50 हजार रुपयांची गुंतवणूक करत भावंडांच्या हाती या व्यवसायाची जबाबदारी दिली. 

आपण सुरु केलेल्या या उद्योगाला आपली जास्त गरज असल्याचं लक्षात येताच मुस्तफा यांनी परदेशातील नोकरी सोडत देश गाठला. पण, इथे नवी आव्हानं त्यांची वाट पाहत उभीच होती. एक वेळ अशीही आली, जेव्हा ते 25 कर्मचाऱ्यांना पगारही देऊ शकत नव्हते. पण, मी तुम्हाला एके दिवशी कोट्यधीश करेन हे वचन  मात्र त्यांनी दिलं होतं. 

जवळपास आठ वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांच्या iD Fresh Food या कंपनीचा नफा तब्बल 2 हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आणि त्यांनी दिलेलं वटनही पूर्ण झालं. आजही त्यांच्या या उद्योगाची घोडदौड अशीच सुरु आहे. आपल्या या यशाच शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे, असं मुस्तफा न चुकता सांगतात. शिक्षक आणि वडिलांना संधी मिळेल तेव्हा मुस्तफा न चुकता आपल्या यशाचं श्रेय देतात आणि एका मजुराचा मुलगाही काय करु शकतो याचं उत्तम उदाहरण सर्वांपुढे ठेवतात.