लखनऊ : गोरखपूरच्या बीआरडी रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेने झालेल्या ३७ बालकांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिका-यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलं आहे.
योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी या रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत योगी आदित्यनाथ भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदीही चिंतीत असून त्यांनी तात्काळ केंद्रीय पथक गोरखपूरला पाठवल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक रुग्णांची तपासणी करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला आहे. काँग्रेस असंवेदनशील झाल्याची टीका यावेळी त्यांनी केली आहे. बीआरडी रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आतापर्यंत जवळपास ३७ मुलांचा मृत्यू झाला आहे.