उत्तर भारताला वादळाचा तडाखा; ४० ठार

  बिहारमध्ये १७, झारखंडमध्ये १३ आणि उत्तर प्रदेशमध्ये १० जणांचा या वादळात मृत्यू झाला.

Updated: May 29, 2018, 01:35 PM IST
उत्तर भारताला वादळाचा तडाखा; ४० ठार title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली: अचानक आलेल्या वादळाने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडला जोरदार तडाखा दिला. सोमवारी आलेल्या या वादळात ४० जण ठार, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. हे वादळ इतके प्रचंड होते की, यात माणसांसोबतच काही प्राणी आणि वित्त हानीही मोठ्या प्रमाणावर झाली. 

बिहारला मोठा फटका

प्राप्त माहितीनुसार सर्वाधिक मृत्यू (१७) बिहारमध्ये झाले.  उत्तर भारतात तापमानाचा पारा चढला आहे. अशात सोमवारी रात्री वातावरण अचानक बदलले. सोसाट्याचा वारा सुटला आणि पाठोपाठ मोठे वादळ आले. यात विजाही कोसळल्या. या वादळाचा बिहार, उत्तर प्रदेश, झारखंडला जोरदार तडाखा बसला. अनेक भागात झाडे उन्मळून पडली. वाहतूक विस्कळीत झाली. काही ठिकाणी इमारतींचीही पडझड झाली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,  बिहारमध्ये १७, झारखंडमध्ये १३ आणि उत्तर प्रदेशमध्ये १० जणांचा या वादळात मृत्यू झाला.

बचाव आणि मदतकार्य सुरू

दरम्यान, वादळाचा सर्वाधिक फटका हा बिहारला बसला. या राज्यातील कटिहार, नवादा, मुंगेर आणि रोहतास या भागात मोठे नुकसान झाले. दरम्यान, वादळाचा फटका बसलेल्या परिसरात मदतकार्य सुरू आहे.