Passenger Stuck Inside Flight Toilet: मुंबईहून बंगळुरुला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानमध्ये एक प्रवासी अशा काही विचित्र अडचणीत सापडला की विमान लॅण्ड केल्यानंतरच त्याची सुटका करता आली. या प्रवाश्याने आपल्या 1 तासाहून अधिक वेळेच्या प्रवासामधील अर्ध्याहून अधिक वेळ विमानाच्या टॉयलेटमध्ये घावला. या घटनेनंतर आता स्पाइसजेट कंपनीने प्रवाशाची माफी मागितली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, स्पाइसजेटच्या विमानात हा प्रकार मंगळवारी घडला. विमानाने मुंबई विमानतळावरुन बंगळुरुच्या दिशेने उड्डाण केल्यानंतर हा प्रवासी विमानातील टॉयलेटमध्ये गेला होता. मात्र त्याने नंतर बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा उघडतच नव्हता. प्रवाशाने वेगवेगळ्या पद्धतीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा काही उघडला नाही.
बरेच प्रयत्न करुनही दरवाजा उघडत नसल्याने या प्रवाशाने आतून आरडाओरड करत केबिन क्रूची मागत मागितली. दरवाजा बाहेरुन ढकला. काहीही करुन दार उघडा आणि मला बाहेर काढा अशी विनंती या प्रवाशाने केबिन क्रूला केली. मात्र त्यांनाही दरवाजा उघडता आळा नाही. अखेर विमान लॅण्ड होत नाही तोपर्यंत तुम्ही टॉयलेटमध्येच बसून राहा असं या प्रवाशाला केबिन क्रूने सांगितलं. विमान लॅण्ड झाल्यानंतर टेक्निशिएनला बोलवण्यात आलं. टेक्निशिएनलाही बऱ्याच प्रयत्नानंतर हा दरवाजा उघडण्यात यश आलं. हा प्रवासी एका तासाहून अधिक वेळ विमानाच्या टॉयलेटमध्येच होता. त्याचा जवळपास संपूर्ण प्रवास टॉयलेटमधूनच झाला.
दरवाजा उघडता येत नसल्याने विमान उड्डाणादरम्यान केबिन क्रूने टॉयलेटच्या दाराच्या खालील फटीमधून या प्रवाशासाठी एक चिठ्ठी पाठवली. "आम्ही दरवाजा उघडण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. मात्र आम्हाला दरवाजा उघडता येत नाहीये. तुम्ही घाबरु नका, काही मिनिटांमध्ये विमान लॅण्ड होणार आहे. तोपर्यंत तुम्ही कमोडच्या सीटचं झाकण बंद करुन त्यावर बसून राहा. स्वत:ला सुरक्षित ठेवा. लॅण्डिंगनंतर विमानाचा मुख्य दरवाजा उघडल्यावर लगेचच इंजीनिअर मदतीसाठी येतील. चिंता करु नका," असा मजकूर या चिठ्ठीत लिहिला होता.
या घटनेनंतर स्पाइसजेटने एक पत्रक जारी केलं आहे. घडलेल्या घटनेबद्दल कंपनीने खेद व्यक्त केला आहे. या प्रवाशाला संपूर्ण प्रवासादरम्यान लागेल ती मदत देण्यात आली, असं कंपनीने म्हटलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 16 जानेवारी रोजी हा प्रकार घडला. टॉयलेटच्या दरवाजाचं लॉक अडकल्याने तो उघडत नव्हता, असं कंपनीचं म्हणणं आहे. विमान लॅण्ड होताच इंजिनिअरने काही वेळात दरवाजा उघडून अडकलेल्या प्रवाशाला बाहेर काढण्यात आलं.