२३ नेत्यांच्या लेटर बॉम्बनंतर काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी, सोनिया गांधी राजीनाम्याच्या तयारीत

काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग

Updated: Aug 23, 2020, 06:21 PM IST
२३ नेत्यांच्या लेटर बॉम्बनंतर काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी, सोनिया गांधी राजीनाम्याच्या तयारीत title=

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षात नेतृत्वावरून सुरू असलेल्या घडामोडींमध्येच आता सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत सोनिया अध्यक्षपद सोडू शकतात, असं बोललं जातंय. २०१९ साली लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत ऑगस्ट महिन्यात राजीनामा दिला होता. यानंतर वर्षभरापेक्षा जास्त काळ सोनिया गांधी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष आहेत. 

अध्यक्ष म्हणून आता मला कायम राहायचं नाही, त्यामुळे नवा अध्यक्ष शोधा, असं सोनिया गांधींनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे सोनिया गांधींनी अंतरिम अध्यक्षपद सोडलं, तर पुढे पक्षाचं नेतृत्व कोण करणार? याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. 

काँग्रेसमध्ये लेटरबॉम्ब, २३ नेत्यांचं सोनियांना पत्र

काँग्रेस पक्षात दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत बदल करण्यात यावेत, अशी मागणी करणारं पत्र काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधींना लिहिल्याची माहिती समोर आली. यानंतर आता काँग्रेसमधल्या घडामोडींना वेग आला आहे. गांधी कुटुंबाला अशाप्रकारे आव्हान देणे अशाप्रकारे चुकीचं असल्याचं संजय निरुपम आणि कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले आहेत. असे मुद्दे उपस्थित करण्याची ही योग्य वेळ नसल्याचं अमरिंदर सिंग म्हणाले. 

ही योग्य वेळ नाही- कॅप्टन अमरिंदर सिंग

राहुल गांधींचं नेतृत्व बोथट करण्याचं षडयंत्र- संजय निरुपम

काँग्रेसमधले काही जण राहुल गांधींनी पुन्हा अध्यक्ष व्हावं, अशी मागणी करत आहेत. तर काही कार्यकर्ते प्रियंका गांधींनी अध्यक्ष व्हावं, अशी मागणी करत आहेत. तर गांधी घराणं सोडून कोणीतरी पक्षाचं अध्यक्ष व्हावं, असं प्रियंका गांधी काहीच दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी राहुल गांधींनी पुन्हा अध्यक्ष व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. 

कोण होणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष?