नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे लोक एसटी कर्मचाऱ्यांचा पुळका घेऊन त्यांना भडकावतायत असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी सरकारला सहानभूती आहे. आम्हाला कामगारांच्या प्रश्नांविषयी आस्था आहे. शिवसेनाही ही कामगार क्षेत्रातूनच जन्माला आलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कष्टकऱ्यांचं नेतृत्व शिवसेना करतेय, त्यामुळे कामगारांविषयी आमची भूमिका चुकीची आहे हे सांगण्याची आम्हाला गरज नाही, असं संजय राऊत यांनी सुनावलं आहे.
एका एसटी कर्मचाऱ्यांनी एक व्हिडिओ पाठवला, आज ज्या मागण्या एसटी कर्मचारी करत आहेत, त्याच मागण्या फडणवीस सरकारच्या काळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे घेऊन एसटी कामगार गेले होते, त्यांनी या कामगारांना हकलून दिलं होतं. हा व्हिडिओ पाहून मला हसू आलं, अशी आठवण संजय राऊत यांनी करुन दिली.
कोव्हिड काळात सरकारवर आर्थिक बोजा आहे, संकट आहे, त्यासंदर्भात त्या खातातील मंत्री बोलतील, पण शिवसेनेने कामगारांच्या मागण्यांबद्दल कायम आस्था ठेवली आहे. आता तुम्ही जी नौटंकी करताय, अटक करुन घेताय, आंदोलन करणं, कामगारांना फूस लावणं, या भूलथापांना बळी पडू नका, आणि नुकसान करुन घेऊ नका असा आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.
भारतीय जनता पक्ष सध्या बाहेरच्य लोकांनी हायजॅक केला आहे, त्यांचा पक्षाच्या विचारसरणीशी काहीही संबंध नाही असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आज गोपीनाथ मुंडे असते तर त्यांनी एसटी कामगाराशी चर्चा करुन, सरकारशी चर्चा करुन यातून मध्य मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी भडकलेल्या आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न नक्कीच केला नसता, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपातील जे ओरिजनल, शुद्ध लोकं आहेत त्यांच्याशी माझं बोलणं होतं, हा प्रश्न जो आहे तो एकत्र येऊन सोडवायला हवा, सरकारची कोंडी होईल, सरकारची बदनामी होईल म्हणून आंदोलनात तेल ओतायचं, हे आम्हाला मान्य नाही, असं सांगणारेही आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.