नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला काही महिने बाकी असताना भाजपकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत जोरदार फटका बसल्यानंतर पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. याचाच एक भाग म्हणून माजी मुख्यमंत्र्यांना केंद्रीय निवडण समितीत सामावून घेतले आहे. त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील सत्ता गमवावी लागली होती. आता या तिन्ही राज्यांच्या माजी मुख्यमंत्र्यांना भाजपने नवीन जबाबदारी सोपवली आहे. या तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांची भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
याबाबत पक्षाने गुरुवारी सायंकाळी ट्वीट केले. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह यांनी या नियुक्तीबाबत ट्वीट करून या नव्या निवडीची माहिती दिली. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसकडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंग आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची भाजपकडून राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती या ट्वीट द्वारे दिली.
Shivraj Singh Chouhan, Dr Raman Singh and Vasundhara Raje appointed national vice presidents of BJP. pic.twitter.com/i3ERqtzFbg
— ANI (@ANI) January 10, 2019
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने कोणताही धोका पत्कारायचा नाही. त्यामुळे पक्ष बांधणीवर लक्ष देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या तिघांनी निवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. जरी तीन राज्यातील सत्ता गेली तरी येथे भाजपच्या खासदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पक्षाने पुन्हा माजी मुख्यमंत्र्यावर जबाबदारी सोपविली आहे. दरम्यान, याआधी अमित शाह यांना हटवून शिवराज सिंह चौहान यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी काहींनी केली होती. मात्र, शिवराज चौहान यांनी उपाध्यक्ष पदावर निवड करुन पक्षाने आता या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.