श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरहमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सेनेचा एक मेजर आणि तीन सैनिक शहीद झालेत. मेजर कौस्तुभ प्रकाश कुमार राणे, विक्रमजीत सिंग, हमीर सिंग, मनदीप सिंग रावत यांचा शहिद जवानांमध्ये समावेश आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत दोन दहशतवादीही ठार झालेत. या घटनेवर केंद्र आणि महाराष्ट्रात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनं प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी, गेल्या चार वर्षांत जेवढे जवान शहीद झालेत तेवढे तर गेल्या ५० वर्षांत झाले नसल्याचं म्हटलंय.
तर यावर बोलताना, पाकिस्तानसोबत चांगले संबंध आणि घुसखोरी एका वेळी चालू शकत नाही... असं जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स नेते फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलंय. पाकिस्तानाला भारतासोबत संबंध सुधारायचे असतील तर घुसखोरी थांबवावी लागेल... असंही त्यांनी म्हटलं.
काल रात्री नियंत्रण रेषेवरून आठ दहशतवाद्यांनी घुसखोरीच्या प्रयत्नात होते. त्यावेळी राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी ही घुसखोरी रोखण्यासाठी गोळीबार केला. चकमकीत दोन दहशतवादी जागीच ठार झाले. तर चौघांनी पाकिस्तानाच्या हद्दीत पळ काढला. आणखी दोन दहशतवादी मारले गेल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे. अद्याप त्यांचे मृतदेह हाती लागलेले नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर जवानांनी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांच्यावर फायरिंग केली. फायरिंग करत ते भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. लष्कर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दहशतवादी घुसखोरी करत असतांना पाकिस्तानचे जवान त्यांना कव्हर फायरिंग देत घुसखोरी करण्य़ास मदत करत होते. हे दहशतवादी रात्री 1 वाजता घुसखोरीचा प्रयत्न करत होते. पाकिस्तानी जवानाकडून फायरिंग सुरु झाल्यानंतर भारतीय जवान अलर्ट झाले.