नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे (आरएसएस) अलिकडील काही वर्षांत हिंदू धर्माचे मोठे नुकसान झाले आहे, असे उद्गार शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी काढले आहेत. शकराचार्य स्वरूपानंद यांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही तीव्र शब्दांत टीका केली आहे. मोहन भागवत यांना हिंदू धर्माबाबत काहीच माहिती नाही, हे फार धक्कादायक आहे, असेही शंकराचार्यांनी म्हटले आहे.
शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी इंडिया टुडेसोबत बोलताना संघ, भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोहन भागवत यांना हिंदू धर्माबाबत काहीच माहिती नाही, हे फार धक्कादायक असल्याचे सांगताना शंकराचार्य म्हणाले, 'भागवत म्हणतात की, हिंदू धर्मात लग्न हा एक करार आहे. पण, विवाह ही जीवनभराची साथ आहे. तसेच, भागवत म्हणतात की, जो भारतात तो हिंदूच आहे. तर, अमेरिकेत हिंदू आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांना काय म्हणणा?', असा सवालही शंकराचार्यांनी विचारला आहे.
एका प्रश्नाच्या उत्तरात शंकराचार्य म्हणाले, 'प्रत्यक्षात भाजपचे नेतेच बीफचे सर्वात मोठे निर्यातदार आहेत. असे असतानाही भाजप गोहत्येचा विरोध करते आणि बीफ निर्यात हा भारताला लागलेला डाग असल्याचे सांगते. भाजपने खरोखरच देशाला दिलेली अश्वासने पूर्ण केली काय? खरोखरच हव्या त्या प्रमाणात नागरिकांना रोजगार मिळाला काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील गरीबातील गरीब व्यक्तिला १५ लाख रूपये देण्याचे अश्वासन दिले होते. ते खरेच पूर्ण झाले? आयोध्येत राम मंदिर उभारले? असे एकाहून एक प्रश्न शंकराचार्यांनी उपस्थित केले. तसेच, या प्रश्नाचे उत्तर देण्यात भाजपचे नेते अपयशी ठरत आहेत. याच नेत्यांनी २०१४ मध्ये निवडणूक प्रचार केला होता असेही ते म्हणाले.
दरम्यान, असारमा बापू यांना कायदेशीर मार्गाने सजा मिळाली आहे. पण, त्यांना धार्मशास्त्रानुसार सजा मिळणे अद्याप बाकी आहे. इतकेच नव्हे तर, त्यांच्या मुलगा नारायण स्वामी यालाही सजा व्हायला हवी. लोक जो पर्यंत अशा स्वयंघोषीत बाबांच्या नादी लागून मूर्ख होतील तोपर्यंत हे लोक फायदा घेतच राहतील. धार्मिक संस्थांवर कर लावण्यापूर्वी सरकारने स्वत:च्या खर्चावर नियंत्रण आणावे असा सल्लाही शंकराचार्यांनी दिला.