कोरोनावरील Molnupiravir औषधाचे गंभीर दुष्परिणाम? ICMR ने का केला विरोध

मोलनुपिरावीरबद्दल वैद्यकीय संशोधन परिषदेनं खळबळजनक दावा केला आहे. 

Updated: Jan 12, 2022, 03:38 PM IST
कोरोनावरील Molnupiravir औषधाचे गंभीर दुष्परिणाम? ICMR ने का केला विरोध title=

Corona Update  : कोरोनाविरोधात बाजारात आलेलं नवं हत्यार म्हणजे मोलनुपिरावीर (Molnupiravir). कोरोनाविरोधातलं अँटिव्हायरल औषध म्हणून डीसीजीआयनं (DGCI) मान्यता दिलीय. पण आता या मोलनुपिरावीरबद्दल वैद्यकीय संशोधन परिषदेनं खळबळजनक दावा केला आहे. 

विशेषतः गर्भवती महिला आणि ज्या महिलांना भविष्यात बाळांना जन्म द्यायचाय त्यांच्यासाठी हा दावा अतिशय महत्त्वाचा आहे. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायजेशननुसार मोलनुपिरावीर फक्त ज्येष्ठ नागरिकांना देण्यात यावी. 15 ते 45 वयोगटातल्या महिलांना मोलनुपिरावीर देणं धोक्याचं ठरु शकतं. 

गर्भवती महिलांना धोका
ही गोळी गर्भवती महिलांसाठी धोक्याची ठरु शकते, होणाऱ्या बाळाचा विकास खुंटण्याची शक्यता आहे. तसंच जन्माला येणाऱ्या बाळामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतं. प्रजननक्षम असलेल्या महिलांना हे औषध देणं धोकादायक ठरु शकतं, मोलनुपिरावीरमुळे स्नायूंवरही दुष्परिणाम होतो, असा दावा करण्यात आला आहे

कोरोनावर ठरतंय प्रभावी?
Molnupiravir हे औषध कोरोनावर प्रभावी ठरतं असल्याचा दावा निर्मात्या कंपनीने केला आहे. रुग्णालयात भरती होणाऱ्या आणि मृत्यूच्या जवळ पोहचलेल्या रुग्णांचा धोका या औषधामुळे कमी होतो. रुग्णांना या औषधाचा 200 एमजीचा एक डोस आठवड्यातून 5 दिवस घ्यावा लागेल, असं सांगण्यात आलं आहे. मोलनुपिरावीर ही गोळी रुग्णाला गंभीर होण्यापासून वाचवते, असा दावा करण्यात आलाय. मात्र आयसीएमआरनं या औषधाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

कोरोनाला हरवण्याचा दावा करणारी विविध औषधं बाजारात उपलब्ध आहेत. पण अशी कुठलीही औषधं घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. नाही तर भलत्याच दुष्परिणामांना सामोरं जावं लागेल.