रतलाम : देशभरात अनेक रॅगिंगच्या घटना घडत असतात. या रॅगिंग संदर्भात कायदा ही पारीत झाला असला तरी अशा घटनांवर आळा बसत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विद्यार्थ्यांचे रॅगिंग केले जात असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या घटनेत आक्षेप घेणाऱ्या व़ॉर्डनवर देखील हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे नेमकं या महाविद्यालयात चाललं तरी काय ? विद्यार्थ्यांवर कारवाई झाली की नाही असे प्रश्न उपस्थित होत आहे.
मध्य प्रदेशच्या रतलाम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात ज्युनियर विद्यार्थ्यांसोबत रॅगिंग झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांसोबत झालेल्या रॅगिंगच्या या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ २ दिवस जुना असल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हिडिओमध्ये सिनियर विद्यार्थ्यांनी ज्यूनियर विद्यार्थ्यांना एका लाईनीत उभे केले आहे. या लाईनीत हे विद्यार्थी माना खाली करून उभे आहेत. या विद्यार्थ्यांना कानशिलात मारत शिविगाळ करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात रॅगिंग सुरू असल्याची माहिती मिळताच वॉर्डन डॉ. अनुराग जैन तेथे पोहोचले असता, काही विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर दारूच्या बाटल्या फेकून हल्ला केला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले आहेत. रॅगिंगशी संबंधित संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एका विद्यार्थ्याने लपवून बनवला आहे, जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रतलाम मेडिकल कॉलेज में जूनियर छात्रों से रैगिंग, सूचना पर वार्डन पहुंचे तो उन पर भी हुआ हमला #Ratlam #RatlamMedicalCollege #Ragging #MedicalCollegeRagging https://t.co/GXwrON9gLm pic.twitter.com/EOgjy1E5kZ
— Amar Ujala (@AmarUjalaNews) July 30, 2022
या प्रकरणी अँटी रॅगिंग समितीकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जितेंद्र कुमार गुप्ता यांनी दिली आहे. रॅगिंग करणारे विद्यार्थी 2020 च्या बॅचचे आहेत. त्यांच्याकडून 2021 च्या बॅचमधील विद्यार्थ्यांचं रॅगिंग करण्यात येत आहे. रॅगिंग करणाऱ्या 10 विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर लवकरच कठोर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.