'विषारी दारुबळींना सरकारच जबाबदार'

विषारी मद्यप्राशनामुळे जवळपास ७९ जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. 

Updated: Feb 10, 2019, 01:40 PM IST
'विषारी दारुबळींना सरकारच जबाबदार'  title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांमध्ये सुरू असणाऱ्या विषारी दारूचा कहर आता राजकीय पटलापर्यंत येऊन पोहोचला आहे. उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी मद्यप्राशनामुळे जवळपास ७९ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आणि पुन्हा एकदा हा मुद्दा प्रकाशझोतात आला. ज्याविषयी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आपली प्रतिक्रिया देत सत्तेत असणाऱ्या राज्यसासनावर निशाणा साधला आहे. 

'विरोधकांनी नेहमीच या मुद्दाकडे सत्ताधाऱ्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. पण, तरीही त्यांचे डोळे मात्र उघडलेले नाहीत. कारण, मुळात सरकारचाही यामध्ये हात आहे', असा आरोप त्यांनी केला. इतकच नव्हे, तर त्यांनी याविषयीचं एक ट्विटही केलं. शासनाच्या परवानगीशिवाय असे व्यवसाय चालणारच नाहीत. ही बाब अधोरेखित करत राज्याचा कारभार सुरळीतपणे चालवण्यास भाजपा सरकार अपयशी ठरल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

आतापर्यंत उत्तर प्रदेशच्या सहारनपूर, कुशीनगर आणि उत्तराखंडमध्ये जवळपास 79 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, काहींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरिद्वारमध्ये तयार करण्यात आलेल्या दारूमध्ये नशा वाढवण्यासाठी उंदीर मारण्याचं औषध टाकल्याची शंका सध्या व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी बऱ्याचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यात काही अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचं कळत आहे. त्यामुळे आता या साऱ्याचा मुळ सूत्रधार कोण आणि हे सत्र नेमकं कधी थांबणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.