लखनऊ : समाजवादी पक्षाकडून राज्यसभा उमेदवारी न मिळालेले नाराज नेते नरेश अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीमध्ये नरेश अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमधून जया बच्चन यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी दिली. यानंतर नरेश अग्रवाल नाराज झाले. जया बच्चन यांच्यामुळे माझं तिकीट कापण्यात आल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला.
भाजपमध्ये येताना मी कोणतीही अट ठेवली नाही. तसंच राज्यसभेचं तिकीटही मागितलं नाही, असं नरेश अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. समाजवादी पक्षाचे सहा राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ (किरणमय नंदा, दर्शन सिंग यादव, नरेश अग्रवाल, जया बच्चन, मुनव्वर सलीम आणि अलोक तिवारी) यावर्षी संपतोय.
उत्तर प्रदेश विधानसभेच्या सध्याच्या आकडेवारीनुसार सपाकडे ४७ मतं आहेत. या मतांच्या जोरावर अखिलेश यादव फक्त एकाच उमेदवाराला राज्यसभेत पाठवू शकतात. त्यामुळे जया बच्चन यांनाच सपानं पुन्हा उमेदवारी दिली. सपा त्यांच्याकडे असलेली जास्तीची मतं बीएसपी उमेदवाराला देणार आहेत.
पक्षानं माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे मी खुश आहे, अशी प्रतिक्रिया जया बच्चन यांनी दिली आहे. पक्षानं ठेवलेला विश्वास खरा ठरवण्याचा मी प्रयत्न करेन, असं जया बच्चन म्हणाल्या. तुमच्याऐवजी सपाच्या ज्येष्ठ नेत्याला राज्यसभेवर का पाठवण्यात आलं नाही, यावर प्रतिक्रिया देताना मी ज्येष्ठ नाही का असा सवाल जया बच्चन यांनी विचारला.