समाजवादी आणि बहुजन समाज पार्टीच्या आघाडीची घोषणा ?

 समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या आघाडीची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात  होणार आहे.

Updated: Jan 12, 2019, 10:38 AM IST
समाजवादी आणि बहुजन समाज पार्टीच्या आघाडीची घोषणा ? title=

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या आघाडीची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात  होणार आहे. सपाचे अध्यक्ष तसेच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन या आघाडीची घोषणा करणार आहेत. या आघाडीत काँग्रेस असणार नाही. मात्र सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मतदारसंघात या दोन्ही पक्षाचे उमेदवार नसतील. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ८० जागा असून त्यापैकी सपा-बसपा प्रत्येकी ३७ जागा लढवणार आहेत. राष्ट्रीय लोक दल आणि निशाद पार्टी या लहान पक्षांनाही आघाडीत घेऊन काही जागा देणार असल्याची माहिती मिळतेय. मात्र त्यांच्या जागांची बोलणी अद्याप बाकी आहे.

मतभेद विसरून आघाडी 

भाजपा आणि मित्र पक्षांनी २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ७३ जागा जिंकल्या होत्या. भाजपाला टक्कर देण्यासाठी मतभेद विसरून आघाडी होणं आवश्यक असल्याचे सपा-बसपाला वाटतंय.

राष्ट्रीय लोकदल हा या आघाडीत सामील होणार असल्याचे सांगितले जात असले तरी अखिलेश यादव, मायावती शनिवारी घेणार असलेल्या पत्रकार परिषदेला हजर राहण्यासाठी या पक्षाच्या नेत्यांना अद्याप निमंत्रण आलेले नाही. या पक्षाने लोकसभेच्या सहा जागा मागितल्या असल्या तरी त्याला फक्त दोन ते तीनच जागा देण्यात येतील असं बोललं जात आहे.