रेल्वेत खेळणी विकणाऱ्या तरुणाची तुरुंगातून सुटल्यावर मोदी सरकारकडे ही मागणी

 हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली. 

Updated: Jun 7, 2019, 07:13 PM IST
रेल्वेत खेळणी विकणाऱ्या तरुणाची तुरुंगातून सुटल्यावर मोदी सरकारकडे ही मागणी  title=

नवी दिल्ली : ट्रेनमध्ये खेळणी विकणाऱ्याचा व्हिडीओ काही दिवसांपुर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. हा खेळणीवाला राजकीय नेत्यांची मिमिक्री करत खेळणी विकत होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली. अवधेश दुबे असे या इसमाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील भदोही येथे राहणारा आहे. त्याचा परिवार खूप वर्षांपासून वलसाड येथे राहतो. 2005 मध्ये अवधेशचे मामा त्याला वलसाड येथे घेऊन गेले. त्याचे मामा तिथे खेळणी विकायचे. त्यानंतर अवधेश देखील हेच काम करु लागला. 

गुजरातमधील सुरतमध्ये रेल्वेत खेळणी विकणाऱ्या अवधेशच्या व्हिडीओची खूप चर्चा झाली. साधारण सहा मिनिटांच्या या व्हिडीओत धवलेशच्या गुणांचे खूप कौतूक झाले. कोणाला त्याची स्टाईल आवडली तर कोणाला त्याचे राजकारण्यांची खिल्ली उडवले आवडले. रेल्वेत अवैधरित्या खेळणी विकण्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. त्याला मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर नेल्यानंतर जेलमध्ये पाठवण्यात आले. तसेच त्याला 3500 दंड देखील भरावा लागला. माझ्याकडे हे पैसे भरल्याची पावती आहे. मोबाईलमध्ये आहे..तुम्ही म्हणत असाल तर दाखवतो असे अवधेश सांगतो.

त्याला दहा दिवसांचा तुरुंगवास झाला होता. पण दोन दिवस राहील्यानतर त्याला सोडण्यात आले. मला नेण्यासाठी पोलिसांची गाडी आली होती. मला सुरतच्या आयपीएस अधिकाऱ्यांकडे नेण्यात आले. त्यांनी मला तिकीट काढून ट्रेनने भदोही पाठवले. मला त्यांचे आभार मानायचे आहेत असेही त्याने सांगितले. जेलमध्ये मला खूप सारे कॅरेक्टर सापडले. येणाऱ्या काळात मी त्यांच्यावर कॉमेडी करुन दाखवेन. मला हेच करायला येतं आणि मी हेच करत आलोय..अजून मी काय करु ? असा प्रश्न देखील तो विचारतो. जेलमध्ये गेल्यानंतर त्याचा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. सरकारने माझ्यासारख्या सेल्समनला वैध करण्यासाठी पाऊले उचलावीत अशी मागणी त्याने मोदी सरकारकडे केली आहे. कारण खूप साऱ्यांचा हा पोटाचा व्यवसाय असल्याचे त्याने म्हटले आहे.