देव-देवतांबद्दलच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर नरेश अग्रवाल यांची माफी

समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते नरेश अग्रवाल यांच्या विधानामुळे राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ उडाला.

Updated: Jul 19, 2017, 10:08 PM IST
देव-देवतांबद्दलच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर नरेश अग्रवाल यांची माफी  title=

नवी दिल्ली : समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते नरेश अग्रवाल यांच्या विधानामुळे राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ उडाला. गोरक्षकांकडून होणाऱ्या मारहाण-हत्यांबाबत चर्चा सुरू असताना अग्रवाल यांनी हिंदू देवतांची तूलना मद्याशी केली. यामुळे सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घालत अग्रवाल यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.

सभागृह नेते अरूण जेटली आणि संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनीही अग्रवाल यांची विधानं अयोग्य असल्याचं सांगत त्यांनी माफी मागितली पाहिजे, असा आग्रह धरला. या गोंधळामुळे कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर अग्रवाल यांनी आपल्या विधानांबाबत दिलगिरी व्यक्त केली आणि उपसभापती जे.पी. कुरियन यांनी वाक्यं कामकाजातून काढून टाकत मीडियालाही ती न दाखवण्याबाबत निर्देश दिले.