Covid 19 : जगभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. भारतातही चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जाते आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे.
नव्या XE व्हेरियंटनं वाढवली चिंता
भारतात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या दोन हजारानं वाढली आहे. कोरोनाच्या XE या नव्या व्हेरियंटचे रुग्ण भारतात वाढत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाच्या या नव्या लाटेचा सर्वाधिक फटका बसतोय तो लहान मुलांना. शाळेत जाणा-या मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि याआधीच्या व्हेरियंटच्या तुलनेत XE चं संक्रमण जलद गतीनं होत असल्यानं पालकांच्या छातीत धस्स झालं आहे.
लहान मुलांना ताप आणि सर्दी असेल, गळा आणि शरीर दुखत असेल, कोरडा खोकला, उलट्या आणि हगवण लागली असेल. तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क करा, असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.
कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका
मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी ही लक्षणं सौम्य स्वरूपाची आहेत. वेळीच डॉक्टरांची मदत घेतली तर कोरोनावर सहजपणे मात करणं शक्य होईल. पण निष्काळजीपणा केला तर तुमच्या मुलांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे काळजी घ्या आणि मुलांचं कोरोना लसीकरण वेळीच करून घ्या.