ओमायक्रॉनमुळे भविष्यात मेंदू विकार वाढणार? लंडनच्या शास्त्रज्ञांचं धक्कादायक संशोधन

लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजनं कोरोना रुग्णांचा अभ्यास करून संशोधन अहवाल तयार केला आहे.

Updated: Jan 12, 2022, 08:52 PM IST
ओमायक्रॉनमुळे भविष्यात मेंदू विकार वाढणार? लंडनच्या शास्त्रज्ञांचं धक्कादायक संशोधन title=

नागपूर : देशभरात गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांची संख्या दीड लाखानं वाढली आहे. तर ओमायक्रॉन रुग्णसंख्या सुमारे 4 हजार 461 पर्यंत पोहोचली आहे. सध्या कोरोनाची तिसरी लाट झपाट्यानं पसरत आहे. मात्र रुग्णांमध्ये गंभीर लक्षणं आढळत नाहीत ही एक चांगली आणि समाधानकारक गोष्ट आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्याही कमी आहे. अगदी ओमायक्रॉन झालेले रुग्णही लवकर बरे होत आहेत. त्यामुळे नागरिकांना जास्त घाबरण्याची गरज नाही. पण याच रुग्णांना भविष्यात ब्रेन फॉगसारख्या साईड इफेक्टचा सामना करावा लागू शकतो, असा धोक्याचा इशारा लंडनमधील शास्त्रज्ञांनी दिला आहे. ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजनं कोरोना रुग्णांचा अभ्यास करून संशोधन अहवाल तयार केला आहे. त्यानुसार ओमायक्रॉन व्हेरियंटमध्ये दुर्मिळ 'ब्रेन फॉग'ची लक्षणं आढळली आहेत. 'ब्रेन फॉग' ही काही मेडिकल टर्म नाही, तर त्याची लक्षणं पाहून हे नाव देण्यात आलं आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना मेंदू विकार होतात, असं या संशोधनात समोर आलं. डोकेदुखी, मायग्रेन, स्मृती कमजोर होणे अशा तक्रारी रुग्ण करत आहेत आणि यालाच 'ब्रेन फॉग' म्हणतात.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजे ऑक्टोबर 2020 मध्येच 'ब्रेन फॉग'ची लक्षणं आढळली होती. ताप आणि श्वास घ्यायला येणारी अडचण यावर कोरोना रुग्ण मात करतात. पण कोरोनातून बरे झाल्यानंतर तब्बल 20 टक्के रुग्णांना 'ब्रेन फॉग' होतो, अशी माहिती देखील या संशोधनात समोर आली आहे. त्यामुळं घाबरून जाण्याचं कारण नाही. पण त्यामुळे ओमायक्रॉनला हलक्यात घेण्याचीही चूक करु नका. स्वत:ची काळजी घ्या आणि सरकारने सांगितेल्या नियमांचं पालन करा.