Ram Gopal Varma Joining Politics : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधुम पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेससह अनेक स्थानिक पक्षांकडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या यादी जाहीर होताना पाहायला मिळत आहेत. आता लोकसभा निवडणुकांपूर्वी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राम गोपाल वर्मा हे राजकारणात एंट्री करणार आहेत. विशेष म्हणजे ते यंदाची लोकसभा निवडणूकही लढणार आहेत, असं सांगत त्यांनी पोस्ट शेअर केली होती. मात्र, आता त्यावर त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर करत तुम्ही चुकीचा अर्थ घेतल्याचं म्हटलं आहे. अर्थात त्यांनी फक्त त्यांच्या चाहत्यांची थट्टा केली.
राम गोपाल वर्मा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी अधिकृत ट्विटरवरुन ट्वीट करत एक मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. "अचानक घेतलेला निर्णय... मला तुम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की मी पिठापुरममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे," असे राम गोपाल वर्मा यांनी म्हटले आहे. या ट्वीटद्वारे राम गोपाल वर्मा यांनी राजकारणात प्रवेश करणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे. ते आंध्रप्रदेशच्या पिठापुरम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
SUDDEN DECISION..Am HAPPY to inform that I am CONTESTING from PITHAPURAM
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 14, 2024
राम गोपाल वर्मा यांच्या या ट्वीटनंतर अनेक चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याच्या या ट्वीटवर काहींनी त्याला लोकसभा निवडणूक लढणार की विधानसभा निवडणूक असे प्रश्नही विचारले आहेत. दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये राम गोपाल वर्मा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. मध्यंतरी त्यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.
राम गोपाल वर्मा यांचा जन्म 7 एप्रिल 1962 रोजी आंध्रप्रदेश राज्यातील विजयवाडा या ठिकाणी झाला. त्यांनी विजयवाडामधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयामधून बीइ ही पदवी मिळवली आहे. राम गोपाल वर्मा हे कॉलेजमध्ये असताना त्यांना चित्रपट, सिनेसृष्टी याबद्दल प्रचंड आकर्षण वाटायचे. कॉलेज संपल्यावर त्यांनी हैदराबादमध्ये व्हिडीओ रेंटल लायब्ररी सुरु केली. यानंतर हळूहळू तेलुगू सिनेसृष्टीमधील लोकांशी त्यांची ओळख वाढत गेली. 1989 मध्ये राम गोपाल वर्मा यांचा ‘सिवा’ हा पहिला तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यांनी हा चित्रपट हिंदीतही बनवला.
राम गोपाल वर्मा यांनी प्रामुख्याने हिंदी आणि तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये काम केले आहे. ते लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. त्यांनी दिग्दर्शनासह लेखन आणि निर्मिती क्षेत्रामध्येही काम केले आहे. त्यांनी ‘सत्या’, ‘रंगीला’, ‘सरकार’, ‘कंपनी’ यांसारखे दर्जदार चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यासह त्यांनी ‘दिल से’, ‘अब तक छप्पन’ अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे. राम गोपाल वर्मा यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.