नवी दिल्ली : लोकसभेत भाजपचे बहुमत काठावर असल्याने त्यांची कोंडी करण्याचा इरादा काँग्रेसने स्पष्ट केलाय. कर्नाटकात भाजपला जास्त जागा जिंकूनही सरकार स्थापन करता आलेले नाही. कर्नाटकच्या धर्तीवर काँग्रेसने दुसऱ्या पक्षाला महत्वाचे पद बहाल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. राज्यसभेत भाजपला खिंडत पकडण्यासाठी काँग्रेसने नवी चाल खेळली आहे. काँग्रेसने राज्यसभेत उपसभापतीपदासाठीचा त्याग करुन बिजू जनता दलाला देण्याच्या हाचचाली सुरु केल्यात. त्यासाठी बिजू जनता दलाचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरु असून आघाडीला पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जर बिजू जनता दल राजी झाले तर भाजपचे हातचे उपसभापती पद जाणार अशी सध्या स्थिती दिसत आहे.
काँग्रेसने कर्नाटक आणि पोटनिवडणुकांमध्ये विरोधकांना एकत्र आणून भाजपला जोरदार धक्का दिलाय. आता काँग्रेसने राज्यसभेतही भाजपची कोंडी करण्याची तयारी सुरु केली आहे. उपसभापतीपदासाठी काँग्रेसने बिजू जनता दलाचा उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेसच्या काही नेत्यांनी यासंदर्भात बिजू जनता दलाचे नेते आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी संपर्क केल्याचे वृत्त आहे. भाजप विरोधात विरोधकांची मोठ बांधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यातून काँग्रेसने आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी चंग बांधला आहे. .
बिजू जनता दलाचे नवीन पटनायक यांनी वेळोवेळी भाजपशी जुळवून घेतले असून केंद्र सरकारच्या निर्णयांचे त्यांनी समर्थन केले आहे. वेळप्रसंगी त्यांच्या पक्षाने राज्यसभेत विरोधकांना पाठिंबा देणे टाळले. त्यामुळे त्यांनाच गळाला लावण्याचा इरादा काँग्रेसचा आहे. राज्यसभेचे उपसभापती पी जे कुरियन यांचा कार्यकाळ आता संपणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या पदासाठी निवडणूक होणार आहे. बहुमतासाठी १२२ खासदारांचे संख्याबळ गरजेचे असून भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) १०५ खासदारांचे संख्याबळ आहे. याशिवाय ६ अपक्ष खासदारांचा भाजपला पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस आणि बिजू जनता दलाच्या मतांना महत्त्व प्राप्त झाले आहे. जर काँग्रेसने यशस्वी बोलणी केली तर भाजपला शह मिळू शकतो, अशी परिस्थिती आहे.
बिजू जनता दलाचे राज्यसभेत ९ खासदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत बिजू जनता दलाचे मत आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केलेत. विरोधकांची आघाडी भक्कम करुन भाजपला शह देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. बिजू जनता दल काँग्रेसप्रणित आघाडीत सामील झाल्यास काँग्रेसला १२२ चे संख्याबळ होऊन हे पदही भाजपकडे न जाता विरोधकांकडे येऊ शकते.
बिजू जनता दलासाठी काँग्रेसने उपसभापतीपदही सोडण्याची तयारी दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले. कर्नाटकमध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा असूनही मुख्यमंत्रीपद जनता दल सेक्युलर या पक्षाकडे दिले. याच धर्तीवर उपसभापतीपदही आघाडीतील एखाद्या पक्षाला देऊन आघाडी भक्कम करण्याची काँग्रेसची खेळी आहे.