नवी दिल्ली: राज्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार राजीव सातव यांच्यावर पक्षाकडून पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांना दिल्लीतील काँग्रेसच्या छाननी समितीचे अध्यक्ष करण्यात आल्याची घोषणा शुक्रवारी झाली. त्यामुळे आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून कोणाला तिकीट द्यायचे, याचे अधिकार राजीव सातव यांच्याकडे असतील.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ दोन जागा जिंकता आल्या होत्या. त्यामध्ये राजीव सातव यांच्या हिंगोली मतदारसंघाचा समावेश होता. यानंतर राजीव सातव यांनी झपाट्याने पक्षनेतृत्वाचा विश्वास संपादन केला. ते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे २०१४ पासून त्यांच्यावर संघटनेतील अनेक कामांची जबाबदारी सोपवण्यात येत आहे. मात्र, आता काँग्रेसने राजीव सातव यांच्यावर थेट दिल्लीतील तिकीटवाटपाची जबाबदारी सोपविली आहे.
शरद पवारांमुळे आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळाली- हेमंत सोरेन
महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागा असून गेल्या निवडणुकीत दिल्लीत काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. त्यामुळे यंदा काँग्रेसच्यादृष्टीने उमेदवारांची निवड अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. गेल्यावेळच्या तुलनेत काँग्रेसला अधिक संधी असली तरी त्यांच्यासमोर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे आव्हान असेल. २०१४ मध्ये 'आप'ने जोरदार मुसंडी मारत ६७ जागा जिंकल्या होत्या. तर तीन जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते.