'...म्हणून मतदार भाजपाला निवडून देतात'; मोदींकडून 2024 च्या 'हॅट-ट्रिक'ची भविष्यवाणी

PM Modi Assembly Election Results: "या निकालाने आणखी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. देशातील तरुणांना केवळ विकास हवा आहे," असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 4, 2023, 08:25 AM IST
'...म्हणून मतदार भाजपाला निवडून देतात'; मोदींकडून 2024 च्या 'हॅट-ट्रिक'ची भविष्यवाणी title=
विजयानंतर नवी दिल्लीतील मुख्यालयामध्ये झालं सेलिब्रेशन त्यावेळी मोदींनी केलं भाषण

PM Modi Assembly Election Results: रविवारी तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. यापैकी तेलंगण वगळता इतर तिन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व यश मिळवलं. राजस्थान, मध्य प्रदेशबरोबरच छत्तीसगडमध्येही भाजपाने बहुमताचा आकडा सहज गाठला. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजपाचाच विजय होणार हे निश्चित झाल्याचं म्हटलं आहे. भाजपाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीमधील भाजपाच्या मुख्य कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केलं. 

हाच आमचा मंत्र

पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, "भारतीय जनता पार्टीने सेवा आणि सुशासनाच्या राजकारणाचं नवीन मॉडेल देशासमोर ठेवलं आहे. आमच्या निती आणि धोरणांच्या मुळाशी देश आणि देशवासी आहेत. भारत माता की जय हाच आमचा मंत्र आहे. त्यामुळे भाजपाची सरकारं केवळ धोरणं तयार करत नाहीत तर प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा लाभ व्हावा हे सुनिश्चित करतं. काम करणं आणि त्याचे प्रत्यक्षात फायदे मिळवून देण्याचं राजकारण सत्यात उतरु शकतो हे भाजपाने दाखवून दिलं आहे," असं म्हटलं.

...म्हणून मतदार भाजपाला निवडून देतात

थेट काँग्रेसचा उल्लेख न करताना पंतप्रधान मोदींनी, "भारतामधील मतदार ओळखतात की स्वार्थ काय आहे. जनहित आणि राष्ट्रहीत काय आहे हे सुद्धा मतदारांना ठाऊक आहे. दूध आणि पाण्यामधील फरक भारतीयांना बरोबर समजला आहे. वाटेल त्या पद्धतीने केवळ जिंकण्यासाठी हवेतल्या बाता करणे आणि लोभ, हव्यासाच्या गोष्टी करणे हे मतदारांना आवडत नाही. मतदारांना त्याचं आयुष्य उत्तम करण्यासाठी एक स्पष्ट रोडमॅप आणि विश्वास हवा. भारतीय मतदार हे जाणतात की जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा राज्य पुढे जातं. प्रत्येक कुटुंबाचं जीवनमान सुधारतं. त्यामुळेच मतदार भाजपाला निवडून देत आहेत. ते सातत्याने भाजपाला निवडून देत आहेत," असंही म्हटलं. तसेच पंतप्रधान मोदींनी, "काही लोक तर म्हणत आहेत की आजच्या या हॅट-ट्रिकने 2024 मधील हॅट-ट्रिकची गॅरंटी दिली आहे," असं म्हणताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

तरुणांना केवळ विकास हवा

"आजच्या निकालाने आणखी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. देशातील तरुणांना केवळ विकास हवा आहे. ज्या ठिकाणी सरकारांनी तरुणांविरोधात कामं केली आहेत तिथे सरकार सत्तेतमधून बाहेर पडलं आहे. राजस्थान असो किंवा छत्तीसगड असो किंवा तेलंगणा असो सगळीकडे हेच दिसलं. ही सारी सरकारे पेपर फुटणे आणि भारती घोटाळ्यांच्या आरोपांमध्ये अडकली होती. परिणाम असा झाला या तिन्ही राज्यांमध्ये सत्तेत बसलेले पक्ष आज सत्तेतून बाहेर आहेत. आज देशातील तरुणांमध्ये हा विश्वास वाढत आहे की भाजपालाच त्यांच्या आकांक्षा समजतात आणि त्यासाठी भाजपाच काम करतो. देशातील तरुणाला हे ठाऊक आहे की भाजपाची सरकार तरुणांच्या हिताची आहे. तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करणारी सरकार भाजपाची आहे, यावर तरुणांचा विश्वास आहे," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणीही उपस्थित होत्या.