राहुल गांधींनी घेतली चीनच्या राजदूतांची भेट, काँग्रेसमध्ये गोंधळ

सिक्कीमच्या सीमेवर भारत आणि चीनमधला तणाव वाढत चालला आहे.

Updated: Jul 10, 2017, 06:48 PM IST
राहुल गांधींनी घेतली चीनच्या राजदूतांची भेट, काँग्रेसमध्ये गोंधळ title=

नवी दिल्ली : सिक्कीमच्या सीमेवर भारत आणि चीनमधला तणाव वाढत चालला आहे. या वादामध्येच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी चीनचे राजदूत लु झाओहुई यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधींनी घेतलेल्या या भेटीवरून काँग्रेसमध्ये मात्र चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला.

सुरुवातीला काँग्रेसनं राहुल गांधी आणि चीनी राजदूतांची कोणतीही भेट झाली नसल्याचा दावा केला. पण आता मात्र अशी भेट झाल्याचं काँग्रेसनं स्वीकारलं आहे. खुद्द राहुल गांधींनीही यानंतर ट्विटरवरून चीनच्या राजदूतांची भेट झाल्याचं सांगितलं आहे. महत्त्वाच्या मुद्द्यांवर मला माहिती असावी. चीनच्या राजदूतांबरोबरच मी एनएसएचे माजी अधिकारी, उत्तर-पूर्वेतील काँग्रेस नेते आणि भूतानच्या राजदूतांना भेटलो, असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे.

चीनच्या राजदूतांना भेटल्यामुळे माझ्यावर एवढी टीका होत असेल तर देशाचे तीन कॅबिनेट मंत्री चीनला का जातात असा सवालही राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. चीनचे एक हजार जवानांनी भारतामध्ये घुसखोरी केली होती तेव्हा चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत मी झोपाळ्यावर बसलो नव्हतो, असा टोमणाही राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.