नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधींनी महाराष्ट्रातल्या महाविकासआघाडी सरकारबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. मात्र आता राहुल गांधींनीच याबद्दल स्पष्टीकरण देत माध्यमांवर निशाणा साधला. 'पेड मीडियाने त्यांच्या मालकांना खुश करण्यासाठी आणि खऱ्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. ही व्हिडिओ क्लिप पाहा,' असं ट्विट राहुल गांधींनी केलं.
हे ट्विट करताना राहुल गांधींनी त्यांच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र सरकारबाबत केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण व्हिडिओदेखील जोडला आहे. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र ही देशाची सगळ्यात मोठी संपत्ती आहे, तसंच व्यवसायाचं केंद्रही आहे, त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला पूर्णपणे पाठिंबा द्यायची गरज असल्याचं राहुल गांधी या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.
Watch this video to see how paid media distorts the truth to serve their masters and distract attention from REAL issues. pic.twitter.com/i0pHwnbtvk
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 26, 2020
मंगळवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांना महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकडेवारीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी राहुल गांधींनी सरकारला पाठिंबा देणं आणि सरकार चालवणं यात फरक असतो, अशी प्रतिक्रिया दिली. तसंच आम्ही महाराष्ट्र सरकारला पाठिंबा देत आहोत, पण मोठे निर्णय घेण्याच्या भूमिकेत आम्ही नाही, असं सांगितलं होतं.
राहुल गांधींच्या या विधानाचा दाखला घेत भाजपनेही निशाणा साधला. संकटसमयी काँग्रेसने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एकटं पाडल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली.