Rahul Gandhi Bike Ride To Ladakh: काँग्रसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे मागील काही दिवसांपासून लडाखच्या दौऱ्यावर असून त्यांनी केलेली बाईक राईड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शनिवारी राहुल गांधी यापूर्वी कधीही न दिसलेल्या अवतारामध्ये पाहायला मिळाले. राहुल गांधी स्वत: बाईक चालवत (Rahul Gandhi Bike Ride) लडाखमधील पँगाँग येथे पोहोचले. मात्र राहुल गांधींच्या या दौऱ्याचा व्हिडीओ चक्क केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळातील एका मंत्र्याने शेअर केला आहे. राहुल गांधी लडाखला गेल्याबद्दल या मंत्र्याने त्यांचे आभार मानले आहेत. नेमका हा प्रकार काय आहे जाणून घेऊयात...
राहुल गांधी आज जगप्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठी त्यांचे वडील आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती साजरी करणार आहे. राहुल गांधींनी या बाईक राइडचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. राहुल गांधी एखाद्या प्रोफेश्नल बाईकरप्रमाणे हेल्मेट, ग्लोव्हज, रायडिंग बुट्स आणि जॅकेट अशा रायडर पोजमध्ये दिसले. लडाखच्या खोऱ्यातून बाईक राईडचा आनंद राहुल गांधींनी घेतल्याचं त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळाला. "पँगाँगच्या मार्गावर... ही जागा जगातील सर्वात सुंदर जागांपैकी एक आहे असं माझे वडील म्हणायचे," अशा कॅप्शनसहीत राहुल गांधींनी हे फोटो शेअर केले आहेत. राहुल गांधींचा लडाख दौरा 25 ऑगस्टपर्यंत असेल असं सांगितलं जात आहे. याच दौऱ्यादरम्यान सध्या ते पँगाँगमधील प्रसिद्ध तलावाच्या परिसरामध्ये आहेत.
ट्विटरवर हेच फोटो शेअर करताना राहुल गांधींनी 'Upwards and onwards - Unstoppable!' अशा कॅप्शनसहीत हे फोटो शेअर केले आहेत. राहुल गांधींचे हे फोटो काँग्रेसच्या अकाऊंटवरुनही कोलाज करुन 'सफर' अशा कॅप्शनसहीत शेअर करण्यात आले आहेत. काँग्रेसच्या ट्वीटर हॅण्डलवरुन राहुल गांधींचा लडाखमध्ये बाईक चालवताना आणि काही आठवड्यांपूर्वी ट्रॅक्टर चालवतानाचा फोटो शेअर करत 'जय जवान, जय किसान' अशी कॅप्शन दिली आहे.
जय जवान - जय किसान pic.twitter.com/x6xXC5zGDu
— Congress (@INCIndia) August 19, 2023
एकीकडे काँग्रेसने हे फोटो शेअर केलेले असतानाच दुसरीकडे माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि विद्यामान पृथ्वी विज्ञान विभागाचे मंत्री किरेन रिजिजू यांनीही राहुल गांधींच्या या दौऱ्याचा फोटोंमधून बनवण्यात आलेला व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी राहुल गांधीचे आभार मानले असली तरी ही पोस्ट त्यांनी उपहासात्मक पद्धतीने केली आहे. किरेन रिजिजू यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये वरील भागात राहुल गांधी 2012 साली लडाखला गेले तेव्हा चारचाकीमधून गेल्याचे फुटेज आहेत. यामध्ये रस्ते फारच ओबडधोबड असून कशीबशी गाडी या रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. तर खालच्या फोटोमध्ये राहुल गांधी डांबरी रस्त्यावरुन बाईक राईड करतानाचे फोटो दिसत आहेत.
या फोटोला किरेन रिजिजू यांनी, "राहुल गांधींचे आभार त्यांनी नरेंद्र मोदी सरकारने लडाखमध्ये बांधलेल्या उत्तम रस्त्यांचं एका अर्थाने प्रमोशन केलं आहे. पूर्वी त्यांनी काश्मीरच्या खोऱ्यामध्ये पर्यटन कशापद्धतीने वाढत आहे हे दाखवलं आणि श्रीनगरमधील लाल चौक येथे आपला तिरंगा शांततेत अभिमाने फडकता येऊ शकतो हे सुद्धा त्यांनी दाखवलं," असा टोला लगावला आहे.
Thanks to Rahul Gandhi for promoting excellent roads of Ladakh built by the @narendramodi govt. Earlier, he also showcased how Tourism is booming in Kashmir Valley & reminded all that our "National Flag" can be peacefully hoisted at Lal Chowk in Srinagar now! pic.twitter.com/vta6HEUnXM
— Kiren Rijiju (@KirenRijiju) August 19, 2023
काही दिवसांपूर्वी बाईक मेकॅनिक्सच्या भेटीदरम्यान राहुल गांधींनी त्यांच्या केटीएम 390 अॅडव्हेंचर बाईकबद्दल सांगितलं होतं. काल शेअर केलेल्या फोटोंमध्ये राहुल गांधी हीच केटीएम 390 अॅडव्हेंचर बाईक चालवताना दिसत आहेत. "माझ्याकडे केटीएम 390 अॅडव्हेंचर आहे. मात्र सुरक्षेच्या कारणांमुळे मला ती चालवू दिली जात नाही," असं राहुल म्हणाले होते. राहुल गांधी ज्या केटीएम 390 अॅडव्हेंचर बाईकने पँगाँगला पोहोचले तिची किंमत 3 लाख 38 हजार ते 3 लाख 60 हजारांदरम्यान असल्याचं कंपनीच्या वेबसाईटवर म्हटलं आहे. केटीएम 390 अॅडव्हेंचर ही बाईक 373 सीसीची बाईक आहे. या बाईकची सर्वाधिक क्षमता 43 बीपीएच इतकी आहे. पिकअप टॉर्क 37 एनएम असून बाईकचा सर्वाधिक वेग हा ताशी 170 किलोमीटर प्रती तासापर्यंत जाऊ शकतो.