चंदीगड : पुढच्या काही दिवसांत राधे माँ ऊर्फ सुखविंदर कौर हिच्या अडचणींत वाढ होण्याची चिन्ह आहेत. स्वयंघोषित देवी राधे माँ हिच्याविरुद्ध कपूरथलास्थित सुरेंद्र मित्तल यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर हायकोर्टानं चौकशीचे आदेश दिलेत.
मंगळवारी १८ डिसेंबर रोजी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात कपूरथलाचे एसएसपी हजर झाले होते. राधे माँ हिच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारींनंतर एक स्पेशल चौकशी समिती तयार करण्यात आलीय. यामध्ये एका आयपीएस अधिकारी आणि एका पीपीएस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. ही एसआयटी एका महिन्याच्या आत चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहे.
राधे माँ हिच्या आवाजाचे सॅम्पल्स सुरेंद्र मित्तल यांना आलेल्या धमकीच्या फोनमधल्या आवाजाशी साधर्म्य साधतात... हे दोन्ही आवाज एकच आहेत, असं फॉरेन्सिक अहवालातून समोर आलंय, असंही एसएसपींनी म्हटलंय. सुरेंद्र मित्तल यांच्या तक्रारीनुसार, राधे माँ हिच्या जागरणाला आणि कार्यक्रमांना विरोध केल्यामुळे तिच्याकडून वारंवार धमक्यांचे फोन येत होते.
परंतु, याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, हे सगळे पुरावे याआधीच पोलिसांकडे देण्यात आले होते... परंतु, पोलिसांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही. पोलिसांनी राधे माँचे व्हॉईस सॅम्पल घेण्यासाठी तिला पोलीस स्टेशनमध्येही बोलावलं नाही... तर तिच्या एका मुलाखतीतून चौकशीसाठी सॅम्पल्स घेतले गेले.
सुरेंद्र मित्तल यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी राजकीय दबावाखाली राधे माँ कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांना हायकोर्टात याचिका दाखल करावी लागली.