इस्रायलमुळे कतारने सुनावली 8 भारतीयांना फाशीची शिक्षा; समोर आली धक्कादायक माहिती

Qatar Death Penalty To 8 Former Indian Navy Men: कतारमधील कोर्टाने सुनावलेला हा निर्णय धक्कादायक असल्याची पहिली प्रतिक्रिया भारत सरकारने दिली असून सर्व कायदेशीर पर्याय पडताळून पाहिले जात आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 27, 2023, 07:17 AM IST
इस्रायलमुळे कतारने सुनावली 8 भारतीयांना फाशीची शिक्षा; समोर आली धक्कादायक माहिती title=
या निकालावर भारत सरकारने आश्चर्य व्यक्त केलं आहे (प्रातिनिधिक फोटो)

Qatar Death Penalty To 8 Former Indian Navy Men: भारताच्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमध्ये (Qatar) फाशीची शिक्षा (Death Penalty) सुनावण्यात आली आहे. गुरुवारी ही बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मागील एका वर्षांपासून हे अधिकारी कतारमधलील वेगवेगळ्या तुरुंगात कैदेत आहेत. कतारमधील कोर्टाच्या या निर्णयावर भारत सरकारने (Indian Government) तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी कायदेशीर पर्याय तपासले जात असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. या अधिकाऱ्यांवर नेमके कोणते आरोप आहेत हे कतारकडून स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप ठेवण्यात आल्याची शक्यता प्रसारमाध्यमांनी व्यक्त केली आहे. 

कोणकोणते अधिकारी आहेत?

भारताच्या ज्या माजी नौदल अधिकाऱ्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यामध्ये कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कमांडर पूर्णेन्दु तिवारी, कमांडर सुग्राकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि सेलर रागेश यांचा समावेश आहे. दरम्यान या शिक्षेच्या सुनावणीमागील इस्रायल कनेक्शन समोर आलं आहे.

समोर आलं इस्रायल कनेक्शन

भारतीय नौदलासाठी काम करणारे हे 8 कर्मचारी इस्रायलसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणामध्ये कोर्टाने या आरोपींवरील आरोप निश्चित केले असून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारत सरकारने या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केला आहे. इस्रायलसाठी हे भारतीय अधिकारी पाणबुडीसंदर्भातील कतारच्या धोरणांबद्दल हेरगिरी करत होते असा आरोप केला जात आहे.

नेमकं या 8 जणांनी काय केलं?

'अलजजीरा'ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कतारमधील तुरुंगात कैद असलेल्या या 8 भारतीयांवर इस्रायसाठी हेरगिरी करण्याचा ठपका ठेवण्यात आला. या आरोपांनुसार कतारमध्ये पाणबुड्यांसंदर्भातील प्रोजेक्टबद्दलची माहिती भारतीय अधिकाऱ्यांनी इस्रायलला दिली आहे. हे सर्व भारतीय कर्मचारी दहरा ग्लोबल टेक्नोलॉजीज अॅण्ड कन्सल्टिंग सर्व्हिसेस या कंपनीसाठी काम करायचे. ही कंपनी कतारला पाणबुड्यांसंदर्भातील तंत्रज्ञानाबद्दलची प्रमुख सल्लागार कंपनी आहे. या कंपनीच्या मदतीने रडारपासून वाचणाऱ्या पाणबुड्या बनवण्याचा कतारचा प्रयत्न सुरु आहे.

या माहितीसंदर्भातील प्रकरण

करताने नौदलाचा तळ निर्माण करुन आपल्या नौदलाच्या वाढीच्या दृष्टीने पाणबुड्यांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने जहाज निर्मिती करणाऱ्या फिनकॅटिएरी एसपीए या कंपनीबरोबर काही करार केले होते. हे करार 2020 साली करण्यात आली होते. मात्र याअंतर्गत निर्मिती सुरु करण्यात आली नाही. कतार आणि इटलीदरम्यान पाणबुड्यांसंदर्भातील एक करार होणार होता. याचबद्दलची माहिती भारतीयांनी इस्रायलला दिल्याचा आरोप केला जात आहे.

 ही कंपनी कोणाच्या मालकीची

हे 8 भारतीय ज्या दहरा ग्लोबल टेक्नोलॉजीज अॅण्ड कन्सल्टिंग सर्व्हिसेस कंपनीमध्ये काम करत होते ती ओमानमधील रॉयल ओमानी (ओमानच्या वायूसेनेमधून सेवानिवृत्त झालेल्या स्क्वाड्रन लीडरच्या) मालकीची कंपनी आहे. ही कंपनी सुरक्षा क्षेत्रात कार्यरत आहे.