'हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालणे म्हणजे फॅशन झालेय'

महाविकासआघाडी सरकारने कोरेगाव-भीमा प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याचे संकेत दिले आहेत.

Updated: Dec 5, 2019, 03:48 PM IST
'हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालणे म्हणजे फॅशन झालेय' title=

नवी दिल्ली: देशात सध्या हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालणे ही एकप्रकारची फॅशन झाली आहे, अशी टीका भाजप खासदार अमर साबळे यांनी केली आहे. त्यांनी गुरुवारी दिल्लीत 'झी २४ तास'शी संवाद साधला. यावेळी अमर साबळे यांनी हिंदुत्ववाद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, हल्ली देशात हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याची फॅशन निर्माण झाली आहे. 

'भीमा कोरेगावप्रकरणी संभाजी भिडे यांची चौकशी करा'

सुशीलकुमार शिंदे यांनी भगवा दहशतवाद हा शब्द अस्तित्वात आणला. त्यांच्याच काळात सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी झाली. अशाप्रकारे कारवाई करण्यापेक्षा देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का लागेल, असा संस्थांवरच कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही अमर साबळे यांनी केली. 

ठाकरे सरकार भीमा-कोरेगाव आंदोलनातील गुन्हे मागे घेणार?

यावेळी त्यांनी कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील गुन्हेही सरसकट मागे घेण्यास विरोध दर्शविला. महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने सरसकटपणे गुन्हे मागे न घेता केवळ सामान्य नागरिकांवरील गुन्हेच मागे घ्यावेत. ज्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध असेल त्यांच्यावरील गुन्हे मागे घेता कामा नये, असेही अमर साबळे यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या आरे कारशेड आंदोलनातील पर्यावरणवाद्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले होते. त्यापाठोपाठ कोकणातील नाणार आंदोलनातील गुन्हेही मागे घेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र, या दोन्ही प्रकरणांच्या तुलनेत भीमा-कोरेगाव आंदोलनाचा विषय अधिक गंभीर आहे. त्यामुळे ठाकरे सरकार इतक्या तातडीने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.